Monday 8 August 2016

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा

जालना- जिल्ह्याच्या विविध विकास कामांची प्रगती तसेच प्रलंबित असलेल्या बाबींचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेतला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी         श्री ताठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंगळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री खांडेकर, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री भालशंकर यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जालना शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत.  पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विद्युत कंपनीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.  नगरपालिकेने विद्युत मंडळाला तात्पुरत्या स्वरुपात काही प्रमाणात रक्कम भरणा करण्याचे निर्देश देत विद्युत मंडळाने पथदिव्यांची जोडणी तातडीने करुन देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
            शहरातल्या 14 हजार 500 विद्युत खांबावर एलईडी बसविण्यासाठी दिल्ली येथील कंपनीशी शासनाचा करार झाला असून या एलईडीमुळे मोठ्या प्रमाणात वीजबीलात बचत होणार असल्याचे सांगत हे विद्युत दिवे अखंडित सुरु राहतील याची दक्षता घेण्यात यावी.  तसेच याची देखभाल दुरुस्तीही कंपनी करणार असल्याचे सांगून शहरात काही ट्रान्सफार्मर खराब झाले असतील तर ते तातडीने दुरुस्त करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
            स्वच्छतेच्या संदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले की, स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात शौचालय उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा आपण संकल्प केला असून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटीतपणे काम करण्याची गरज असून या कामी अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याच्या सुचना करत शौचालय उभारणीचा तालुकानिहाय आढावाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी घेतला.

            जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात होणारी विकास कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत.  दिलेला निधी वेळेत व विहित केलेल्या कामावर खर्च करण्यात यावा.  या निधीपैकी एकही रुपया परता जाता कामा नये याची दक्षता सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी घनकचरा प्रकल्प निधी, परतूर येथील सॅनिटरी पार्क बांधकाम, परतूर तालुक्यातील सहा आदर्श गावांची प्रगती, ई लर्निंग, ई-लायब्ररी यासह जिल्ह्यातील सर्वच विकास कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.

******* 

No comments:

Post a Comment