Monday 1 August 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन संपन्न जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जालना-  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन पाळण्यात येतो.  त्याअनुंषगाने जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन संपन्न झाला.  या  लोकशाही दिनामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभाग एक व जिल्हा पोलीस विभागाची एक असे एकूण दोन  तक्रार अर्ज प्राप्त झाले. 
            यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून विविध विषयावर आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून या सप्ताहामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.  शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ देऊन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            आपले सरकार या शासनाच्या वेबपोर्टलवर सर्वसामान्यांच्या तक्रारी येत असतात.  या प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व वेळेच्या आत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            2 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सुचना करत दरवर्षी जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात येते.  प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आलेले उद्दिष्टही 100 टक्के पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील शासकीय इमारतीमध्ये अनेक असुविधा असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत यासह शासकीय निवासस्थानामध्ये अनेक गैरसोयी असून याबाबत आवश्यक ठिकाणी डागडुजीसह आवश्यक ती सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून अनेक मोक्याच्या ठिकाणी रत्यावर खड्डे पडलेले आहेत.  रस्ते दुरस्तीसह शहरातील विद्युत दिव्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केल्या. 
            या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तहसिलदार अनिता भालेराव, नायब तहसिलदार डीन. एन. पोटे  यांच्यासह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******                                 

No comments:

Post a Comment