Tuesday 15 August 2017

संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री बबनराव लोणीकर



संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी
सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना, दि. 15 – संपुर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता विभागामार्फत यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येत असुन  राज्यात आजपर्यंत 11 जिल्हे, 157 तालुके आणि 17 हजार 700 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या जालना जिल्ह्यातील चार तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन‍ दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते.
 यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजु नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुन एक मोठा क्रांतीकारी निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.  या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. एक लाख 50 हजार रुपयांचे सरसकट कर्ज माफ केले आहे. ज्यामुळे राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. थकीत असलेल्या 90 टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमीत कर्ज भरणाऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यंत शासन मदत  देणार आहे. जालना जिल्हयात 1 लाख 96 हजार शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये कृषी कर्ज थकीत आहे. निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना यामधून 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 जुलै रोजी 4 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.  जालना जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 8 लाख 56 हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपन करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  जालना जिल्ह्यात रस्ते विकासासाठी आजपर्यंत जवळपास  5 हजार 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.  त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र शासनाने मान्यता देऊन वार्षिक नियोजनात 860 कोटी रुपयांची तरतूद केली असुन या रस्त्याच्या कामाचे नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले आहे.  येणाऱ्या 2 वर्षाच्या काळात हा रस्ता पूर्णपणे तयार होणार होऊन या रस्त्यामुळे 6 लाख वारकऱ्यांची पंढपरपुरला जाण्याची सोय होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  जालना जिल्हा या कामामध्ये आघाडीवर असुन जिल्ह्यातील एकुण 2 लाख 44 हजार 541 सातबारा पैकी 2 लाख 43 हजार 630 सातबारा ची तपासणी करुन जिल्हा मराठवाड्यात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.  शेतकऱ्यांना आपले सरकार या पोर्टल व सेवा केंद्रावरुन 23 रुपये भरुन डिजिटली सही केलेला सातबारा उपलब्ध होणार आहे.  या सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा ची प्रत कमी वेळेत व कमी पैशामध्ये उपलब्ध होणार आहे.
जलयुक्त शिवार अंतर्गत मागील 2 वर्षात 398 गावांमध्ये जवळपास 10 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून त्याकरीता 185 कोटी खर्च झाला आहे. त्यामध्ये 615 सिमेंट बंधारे असून जलयुक्तच्या या कामामुळे 1 लाख 87 हजार हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. व 9 हजार 300 टीसीएम पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गतवर्षी टंचाई कालावधीत टँकरची संख्या 622 वरुन 147 वर आली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात 69 गावांसाठी 65 योजना मंजूर करण्यात येत असून त्यासाठी 52 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत 25 गावांकरीता रुपये 18 कोटी 85 लाख निधी उपलब्ध झाला आहे. तसेच भुजल खात्याकडून स्त्रोत बळकटी करणासाठी 4 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन वर्षात समृध्दी महामार्ग, ड्रायपोर्ट, सिडको, तसेच एमआयडीसी फेज-3 माध्यमातून शहरासह जिल्हयाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील विद्युत विकासावर भर देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्हयासाठी 33 केव्हीची 49 केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. 132 केव्हीची 4 व 220 केव्हीची 4 केंद्रे मंजूर करण्यात आली असुन परतूर येथील 220 केव्हीचे केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने चालू असून नागेवाडी येथील उपकेंद्राचे तसेच 33 के.व्ही. च्या 19 केंद्राचे भुमीपूजन नुकतेच करण्यात आले आहे.  जिल्हयातील 14 हजार 500 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला जोडणी देण्याचे काम पूर्ण होत असुन पॉवर फॉर ऑल या योजनेसाठी जालना जिल्हयाला 124 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण क्षमतेने वीज देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी Giosk मशिनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देणाऱ्या मशिनचे पालकमंत्री श्री. लोणीकर यांच्या हस्ते फितकापून उदघाटन करत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पोलीस पथकाने पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली.  जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच स्काऊट गाईडना पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.
 या कार्यक्रमास पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.        
***-****



No comments:

Post a Comment