Thursday 31 August 2017

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचे आवाहन



शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
           संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांचे आवाहन
        जालना, दि. 31 – शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचावण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर  यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना तसेच ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळ, जालना, जनसाथी दुष्काळ निवारण मंच व नवोदय क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापुर तालुक्यातील मान देऊळगाव येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री बावस्कर बोलत होते.
            यावेळी ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळचे सचिव पुष्कराज तायडे, नवोदय क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाचे शिवाजी तायडे, सरपंच हिराबाई डोंगरे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री बावस्कर म्हणाले की, शासन सर्वसामान्यांसाठी अनेकविध योजना राबविते.  या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध माध्यमांद्वारे करण्यात येते.  त्याचाच एक भाग म्हणून आज संवादपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असुन अस्वच्छतेमुळे आज आपल्याला अनेक आजारांचा सामाना करावा लागत आहे.  यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारी शौचालयाची उभारणी करावी.  शौचालयाच्या उभारणीसाठी शासनामार्फत 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचे सांगत याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            शासन राबवित असलेल्या ध्येय, धोरण तसेच विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी व गुजराती या भाषेतुन लोकराज्य मासिक प्रकाशित होत असते.  एमपीएससी, युपीएससीची तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक हे अत्यंत उपयुक्त असुन यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत विविध मान्यवर तसेच अधिकाऱ्यांचे लेख यामधुन प्रकाशित होत असतात.  त्याचबरोबर प्रसंगानुरूप विशेषांकही काढण्यात येतात.  नाममात्र दरामध्ये वर्षभरात 12 अंक वर्गणीदारांच्या पत्त्यावर पोहोच केले जात असल्याचे सांगत गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन लोकराज्यचे वर्गणीदार व्हावे व आपले गाव लोकराज्य ग्राम करण्याचे आवाहन करत शासनाच्या विविध योजनांची माहिती श्री बावस्कर यांनी उपस्थितांना यावेळी दिली.
            यावेळी ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळाचे सचिव पुष्कराज तायडे म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे.  यासाठी प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या योजना समजुन घेण्याची असल्याचे सांगत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत 11 कलमी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असुन लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.  या योजनांचा गावकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन करत शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिवाजी तायडे यांनी केले.  कार्यक्रमास गणेश मंडळाचे पदाधिकारी, बचतगटाच्या महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                  ***-***




No comments:

Post a Comment