Tuesday 15 August 2017

राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व इमारतीच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान
व इमारतीच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखा
-         पालकमंत्री बबनराव लोणीकर
            जालना, दि. 15 – जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्यासक्षमीकरणासाठी शासनामार्फत 192 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन करण्यात येणारे काम वेळेत पुर्ण होण्याबरोबरच कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
          जालना येथील राज्य राखीव पोलीस बलगट क्र. 3 च्या 557 कर्मचारी निवासस्थान व प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, समादेशक भारत तांगडे, सहाय्यक समादेशक श्री मेटकर, विलास नाईक, किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, विरेंद्र धोका आदींची उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस आपल्या प्राणांची बाजी लावुन नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करत असतात. गेल्या 50- ते 60 वर्षात  जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची तसेच इमारतीची दुरुस्ती न केल्यामुळे  दयनिय अवस्था झाली होती. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना दिवस काढावे लागत होते.  जालना येथील राज्य राखीव दलातील कर्मचाऱ्यांनी 26/11 च्या मुंबई येथील हल्ल्यात अत्यंत चोख कामगिरीही बजावली आहे.  अशा कर्मचाऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतुन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तसेच प्रशासकीय इमारतीसाठी  सातत्याने पाठपुरावा करुन 192 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला आहे.  कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाचा तसेच प्रशासकीय इमारतीचा दर्जा व गुणवत्ता अत्यंत चांगली राहील याकडे लक्ष देण्याची गरज असुन गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही.  या कामाची गुणवत्ता तपासणी पथकाकडुन तपासणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
          राज्य राखीव पोलीस दलाबरोबरच येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही अवस्था अत्यंत वाईट आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करुन याचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
          जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजवावी लागते.  वेळप्रसंगी कुटूंबपासुन दूर राहुन सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न पालकमंत्री यांच्या माध्यमातुन मार्गी लागला असुन कर्मचाऱ्यांसाठी होणारी अद्यावत अशा निवासस्थानाच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक भारत तांगडे यांनी केले. सर्वप्रथम कोनशिला अनावरण तसेच टिकाव मारुन या कामाचे भुमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
          या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***


No comments:

Post a Comment