Saturday 15 July 2017

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन तरुण,तरुणींनी आपले आयुष्य घडवावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 15 – देशासह राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होऊन अनेक उद्योगधंदे उभारले जात आहेत. अशा ठिकाणी कुशल मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत असुन तरुण, तरुणींनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन आपले आयुष्य समर्थपणे घडविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, सहाय्यक संचालक वि.का. भुसारे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन.एन. अहिरकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.आर. गायकवाड, नोडल अधिकारी सुरेश बहुरे, प्रशिक्षण अधिकारी अमोल बोरकर, आर.एस. फुले, सु.बा. कदम आदींची उपस्थिती होती.
            प्रगत राष्टांमध्ये मनुष्यबळाची अत्यंत कमतरता आहे.  सन 2022 पर्यंत भारत देशाची 64 टक्के लोकसंख्या ही 15 ते 59 वयोगटातील असणार असुन भारत देश हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक असेल व उत्पादन क्षमता असलेले मनुष्यबळ भारताकडे असेल.  पंतप्रधान यांच्या स्कील इंडिया संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र राज्याने कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले असुन राज्यातील युवक, युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरणक रुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून  देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 64 प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातुन युवक युवतींना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत असुन आजपर्यंत जवळपास 1 हजार 349 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पुर्ण केले असुन 2 हजार 320 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण, तरुंणानी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            जालना जिल्ह्यात ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गांतर्गत स्मार्ट शहरे यासारखे अनेक प्रकल्प येत आहेत.  याठिकाणी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण युवक युवतींना देण्यात यावे.  तसेच जिल्ह्यात रेशीम कोषांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. ग्रामीण भागातील युवक, युवतींनी कृषिक्षेत्राशी निगडीत कौशल्य आत्मसात केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील युवक, युवतींना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्थांनी केवळ शासनाच्या अनुदानापुरते प्रशिक्षण संस्था न चालवता समाजाप्रती त्यांचेही काही देणे लागते या भावनेतुन गरजु तरुण, तरुणींना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटूंबाला या माध्यमातुन उभे करण्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            यावेळी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय तसेच नोकरी प्राप्त केलेल्या तरुण, तरुणींनी शासनाने सुरु केलेल्या या कार्यक्रमामुळे जीवनाला दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
            कार्यक्रमाचे संचलन भरत मोरे यांनी केले तर आभार यांनी एन.एन. अहिरकर  मानले.
            कार्यक्रमास अधकारी, प्रशिक्षण संस्था चालक तसेच तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******


No comments:

Post a Comment