Saturday 1 July 2017

मराठवाडा टंचाईमुक्त करण्यासाठी शाश्वत पाणी साठे निर्माणाबरोबरच वृक्षांची अधिकाधिक लागवड आवश्यक - पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 – गतकाळात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला.  मराठवाडा संपूर्ण टंचाईमुक्त करावयाचा असेल तर शाश्वत पाण्याचे साठे निर्माण करण्याबरोबरच पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
4 कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या व वन महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करुन करण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.
            व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सिद्धीविनायक मोरे, भुजंगराव गोरे, आयेशा खान, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मानवी जीवनामध्ये वृक्षांचे फार मोठे महत्व आहे.  गतकाळात राज्यासह मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला यामागचे कारण वृक्षांची घटत चाललेली संख्या असुन वृक्षांच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.  याच बाबीचा विचार करुन राज्य शासनाने येत्या 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे.   त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्षांची लागवड          1 ते 7 जुलै दरम्यान करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ शासनाचा आहे ही मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता असुन वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ही भावना समाजामध्ये दृढ होण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.  मराठवाड्यात केवळ 4 टक्के व जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ 1.29 टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, जल व वायु प्रदुषण वाढत असुन त्याप्रमाणात वृक्ष लागवड न होता त्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.  याचा परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असल्याची चिंता व्यक्त करत मराठवाड्यासह जिल्ह्यात पाऊस पाडण्यास कारणीभुत असलेल्या अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन करत प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.  लागवड केलेल्या वृक्षांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी राज्यात गत दोन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून 15 हजार गावाच्या नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे.  गावोगावी जलयुक्तच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असुन या कामांमध्ये पाण्याचा संचयही झाला असुन महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वांनी या महत्वाकांक्षी अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            गतवर्षात वृक्ष लागवड सप्ताहामध्ये लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची पहाणीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले.  कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांनी केले तर आभार नायब तहसिलदार संदीप ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी तसेच प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment