Saturday 1 July 2017

शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकाबरोबरच नगदी व हवामानावर आधारित पीके घ्यावीत- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 – भारत हा कृषिप्रधान देश आहे.  भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा फार मोठा वाटा आहे.  शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळून त्यांचा अर्थिकस्तर उंचावण्यासाठी पारंपरिक शेतीपिकाबरोबरच नगदी व हवामानावर आधारित पीके शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृषीदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश टोपे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सभापती दत्ता बनसोडे, सभापती श्रीमती जिजाबाई कळंबे, जि.प. सदस्य श्री जाधव, सदाशिव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना राज्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.  महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे या दृष्टीकोनातून स्व. वसंतराव नाईक यांनी मोलाचे काम केले होते.  नवनवीन बि-बियाणे, तसेच शेतीला शाश्वत पाणी देण्यासाठी जलसंधारणाची कामे केली होती.  त्यांनी केलेल्या कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतीविकासासाठी अनेक नवनवीन योजना राबवित आहे. शेतीविकासासाठी शासनाने अर्थसंकल्पामध्ये 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असुन शेतीविकासासाठीच्या नवनवीन योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा एक अत्यंत किफायतशीर असा जोडधंदा असुन यासाठी शासनामार्फत 2 लाख 55 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.  रेशीम कोषाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेंगलोर येथे जावे लागत होते.  परंतू रेशीम कोषाचे खरेदी केंद्र जालना येथे करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असल्याचे सांगत यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.  रेशीम कोष खरेदी केंद्र कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अत्यंत यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन गतवर्षात 23 कोटी रुपये खर्चून 500 बंधारे उभारण्यात आले आहेत.  याकामी महाराजन ट्रस्ट, नाम फाऊंडेशन यांच्यासह इतर सेवाभावी संस्थांची मोलाची मदत मिळत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            मानवी जीवनामध्ये वृक्षांचे फार मोठे महत्व आहे.  गतकाळात राज्यासह मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला यामागचे कारण वृक्षांची घटत चाललेली संख्या असुन वृक्षांच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.  याच बाबीचा विचार करुन राज्य शासनाने येत्या 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे.   त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्षांची लागवड 1 ते 7 जुलै दरम्यान करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ शासनाचा आहे ही मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता असुन वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ही भावना समाजामध्ये दृढ होण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            आमदार राजेश टोपे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी विकासासाठी अनेक योजना राबवित शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादकता वाढविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांनी शेती किफायतशीर होण्यासाठी शेतीक्षेत्रातील नवनवीन ज्ञात आत्मसात करुन त्याला तंत्रज्ञानाची जोड देत हवामानावर आधारित शेती करावी.  द्राक्ष शेतीच्या माध्यमातून कडवंची या गावाने संपूर्ण राज्यात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला असुन शेतकऱ्यांनी या गावचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कृषिदिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या बि-बियाणे, कृषि औजारे व इतर कृषि साहित्याच्या प्रदर्शनीचे उदघाटनही पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करुन विविध पुरस्कारप्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीविकास अधिकारी श्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन तंत्र अधिकारी मनिषा मिसाळ यांनी केले तर आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी मानले.

*******

No comments:

Post a Comment