Wednesday 18 October 2023

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

 

 

जालना दि. 18 (जिमाका) :-  जिल्ह्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची जालना जिल्ह्यातील एकुण 13 गावामध्ये निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्राचे ऑनलाईन उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रावर जाऊन उद्घाटन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ  यांनी केले आहे

महाराष्ट्र शासन देखील महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक बाजारपेठेत मनुष्यबळ मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देवून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरिता पहिल्या टप्यात जिल्ह्यातील तालुका निहाय ग्रामीण भागात जालना तालुक्यातील देवमुर्ती व सेवली, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी, भोकरदन तालुक्यातील धावडा व वालसावंगी, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी, मंठा तालुक्यातील तळणी, परतूर तालुक्यातील आष्टी व सातोना खु, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व रांजणी आणि अंबड तालुक्यातील महाकाळा व जामखेड या एकुण 13 गावाच्या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.  ग्रामीण कौशल्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करुन सर्व विभागांना कामे सोपविल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे. भारतातील युवा वर्ग ही आपली खूप मोठी आणि महत्वाची साधन संपत्ती आहे. या युवा वर्गाला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर हे युवा कुशल मनुष्यबळ परदेशातल्या अनेक नोकऱ्यांच्या संधींचा लाभ घेऊन भारताच्या नीतिमूल्यांचा जगामध्ये प्रसार करू शकते. या सर्वाचा सारासार विचार करून केंद्र शासनाने सन 2015 मध्ये कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून या मंत्रालयाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment