Monday 23 October 2023

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


 

जालना दि. 23 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यात व शहरात दि. 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी देवीच्या मुर्तीची स्थापना झाली असून दिनांक 23 व 24 ऑक्टोबर रोजी देवी मुर्ती विसर्जना करिता मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी गर्दी असल्यास घाणेवाडी तलाव येथे काही देवी मुर्ती विसर्जनासाठी जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातून पिण्याचे पाणी जालना शहरात येत असल्याने तेथे देवी मुर्ती विसर्जना करिता गेल्यास गावकरी त्यास विरोध करून तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देवी मुर्ती विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक आदेश लागु करणे जरुरीचे आहे. त्यानूसार अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी  फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहेत. आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. तसेच आदेश 23 व 24 ऑक्टोबर रोजी रात्रीचे 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment