Wednesday 25 October 2023

माणसाशी नाळ जोडणारा उपक्रम म्हणजे ‘मेरी माटी, मेरा देश’ - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ *जिल्हा परिषद परिसरात अमृत कलश यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 











 

जालना दि. 25 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम जिल्हाभरात उत्स्फुर्तपणे राबविण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही लाभला.  गावापासून ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश असून जनतेशी नाळ जोडणारा उपक्रम म्हणजे ‘मेरी माटी, मेरा देश’ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या परिसरात ग्रामसेवक संघटना व जिल्हा परिषदेचा पंचायत विभागाने बुधवार दि.25 ऑक्टोबर 2023 रोजी अमृत कलश यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा ) राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं ) अंकुश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा व स्व) बालचंद जमधडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी राजेंद्र सोळुंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बाक) कोमल कोरे, समाजकल्याण अधिकारी तथा गट विकास अधिकारी बदनापूर ज्योती राठोड, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे, सचिव पी. एस . वाघ, मानद अध्यक्ष प्रवीण पवार  यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून गावागावात केलेल्या जाणीव जागृतीचे महत्व सांगितले. या सोबतच स्वयं प्रेरणेने जिल्हा परिषदेने जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. विविध जिल्ह्यातील कामाचा अनुभव ही त्यांनी यावेळी विशद करून मराठवाड्यात जनताभिमुख काम करण्याची अधिक संधी असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. 

ग्रामसेवकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मी भावूक झाले असल्याची भावना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून एकत्रित केलेली माती राज्यस्तरावर संकलित केली जाणार असून, तेथून ते दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प) अंकुश चव्हाण यांनी या उपक्रमामागील पार्श्वभूमी प्रास्ताविकात सांगितली. जिल्हा बाल विवाह मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सादर केलेल्या कवितेस उपस्थितानी प्रचंड दाद दिली. 

ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. बी काळे यांनी यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून केलेले जिल्हाभरातील कार्यक्रमाची  माहिती दिली.  गट विकास अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील अमृत कलश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुपूर्द केले व त्यांनी ते नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकाकडे सुपूर्द केले. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून ते मुंबई व दिल्ली येथे पोहोचवले जाणार आहेत. यावेळी जालना पंचायत समितीच्या महिला ग्रामसेवकांनी सादर केलेले देशभक्ती गीताने वातावरण भारावून गेले. ग्रामसेवकांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. या वेळी सर्व गट विकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सुरुवातीस सर्व ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषद पासून अंबड चौफुली , जिल्हाधिकारी कार्यालय व परत जिल्हा परिषद या दरम्यान रॅली काढली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष, सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका सदस्यांनी प्रयत्न केले. सूत्र संचालन राज्यउपाध्यक्ष डी. पी भालके यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव पी.एस.वाघ यांनी मानले.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment