Saturday 17 November 2018

वलखेड येथे 3 कोटी 32 लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नाही - पालकमंत्री बबनराव लोणीकर



             जालना, दि. 17 –   जिल्ह्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देत येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            परतूर तालुक्यातील वलखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 32 लक्ष रुपये किंमतीच्या रामा 220 ते बामणी वलखेड ते तालुका सरहद या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, अशोकराव बरकुले, सुरेशराव सोळुंके, रमेशराव भापकर, गावचे सरपंच बबन येडेकर, उपसरपंच विश्वनाथ सुरंग, नितीन जोगदंड, रमेश केवारे, संपत टकले, शिवाजी पाईकराव, राजू ढवळे, नारायणराव सुरंग, आसाराम सुरंग, भगवान सुरंग, दत्ता बिल्लारे, शहाजी सुरंग, माऊली डवारे, गंगाधर सुरंग, श्रीहरी सुरंग, अंकुशराव नवल, ओमप्रकाश मोरे, कार्यकारी अभियंता               श्री चौधरी आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.  गेल्या तीन वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत.  गावांना रस्ते व्हावेत,  शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत.  या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.  येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.    राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे. तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  येणाऱ्या आठ महिन्यांच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगत राज्यात 60 लक्ष शौचालयांची उभारणी करुन महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल ठरले आहे.  दिल्ली येथे आयेाजित करण्यात आलेल्या जागतिक परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचा देशाचे प्रधानमंत्री यांच्याहस्ते गौरवही करण्यात आला असल्याचे  श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री चौधरी यांनी केले.
यावलपिंप्री तांडा येथे 3 कोटी 51 लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शुभारंभ
            पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री तांडा-1 येथे राजेगाव-गडमंदिर-यावलपिंप्री तांडा ते रामा -224 या 3 कोटी 51 लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
            यावल पिंप्री तांडा येथे झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार विलास खरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सरपंच छबुराव राठोड, संजय तौर, रमेश महाराज वाघ, देवनाथ जाधव, अंकुश बोबडे, प्रकाश टकले, विष्णु जाधव, नारायण राठोड, प्रमोद राठोड, एकनाथ चव्हाण, बाबुराव पवार, संतोष पवार, शंकर चव्हाण, रामनाथ पवार, अर्जुन पवार, हिंमतराव पवार, वामनराव राठोड, तहसिलदार संजयकुमार डव्हळे,   यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
********




No comments:

Post a Comment