Friday 16 November 2018

पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा -- प्रा. बी.वाय. कुलकर्णी



          जालना, दि. 16 –   पत्रकारीता क्षेत्रात कालानुरुप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.  माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ई-माध्यमामुळे पत्रकारिता क्षेत्रात अधिक गतिमानता आली आहे. आयुष्यातील चढ उताराप्रमाणे पत्रकारितेमध्येही चढ-उतार येत असुन नकारात्मक चर्चेपेक्षा पत्रकारांनी आपल्या सकारात्मकतेने लेखणीची ताकद जाणुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रा. बी.वाय. कुलकर्णी यांनी केले.  
            16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय जालना येथे डिजिटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर दै. दुनियादारीचे कार्यकारी संपादक किशोर आगळे, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री कुलकर्णी म्हणाले की, माध्यमासमोर सद्या समाज माध्यमांचे मोठे आव्हान उभे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या बातम्या व व्हिडीओ बाबतच्या सत्यतेची पडताळणी करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्याच प्रमाणे सामाजिक समस्या व ग्रामीण भागातील प्रश्न यांना माध्यमात मोठया प्रमाणात जागा देणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेत मांडण्यात आले. आयुष्यातील चढ उताराप्रमाणे पत्रकारितेमध्येही चढ-उतार येत असुन नकारात्मक चर्चेपेक्षा पत्रकारांनी आपल्या सकारात्मकतेने लेखणीची ताकद जाणुन समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
किशोर आगळे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या पत्रकारितेचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या प्रेरणेतुन आपण आज या क्षेत्रामध्ये काम करत आहोत.  समाजातील गोरगरीब व वंचिताला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीची ताकद वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.
सर्वप्रथम  राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर  व पत्रकारांनी  आचार्य बाळशास्त्री जांभेकर व बाबुराव विष्णु पराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आभार राजेंद्र वाणी यांनी मानले. कार्यक्रमास मुद्रीत माध्यमांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी तसेच ई-माध्यमांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*******



No comments:

Post a Comment