Saturday 3 November 2018

जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षम रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




            जालना, दि. 3 – जनतेला सुरक्षितता वाटली पाहिजे. यादृष्टीने पोलीस विभागाने अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला. यावेळी ते बोलत होते.
            बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश टोपे, तसेच मुख्यमंत्र्‌यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती  निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस.चैतन्या उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुन्हे प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेने वाढले असले तरी पोलीस विभागाने व शासकीय लोक अभियोक्त्यांनी अधिक जागरुकपणे लक्ष घालणे गरजेचे आहे. गुन्हे प्रकरणे सुटण्यामागील कारणमीमांसा करीत शासनाने निर्गमित केलेल्या 14 शासन निर्णयाच्या आधारे अधिकाधिक प्रकरणात दोषसिद्धी होण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावेत. यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांच्या बैठकांचे नियमित आयोजन करुन सबळ पुराव्याची शहानिशा करुनच प्रकरणे न्यायप्रविष्ट होतील, याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
            यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस स्थानकनिहाय व शासकीय लोकअभियोक्तानिहाय दोषसिद्धीच्या प्रमाणाचा आढावा घेऊन त्यामागील कारणे जाणून घेतली. समन्स आणि वॉरंट देण्याचे प्रमाण गरजेनुसार वाढले पाहिजे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या दाखल गुन्ह्यातील प्रकरणात हयगय न करता आरोपीविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश यावेळी दिले. याशिवाय त्यांनी अशा घटकांना प्रतिबंध घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचीही यावेळी माहिती घेतली.
            गुन्हे उघडकीचे प्रमाण, वाळुचोरीविरुद्ध कारवाई, अवैध हत्यार व अवैध गुटखा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई तसेच अवैध दारुविक्री, जुगार, मोटारवाहन कायद्यांतर्गत कारवाईच्या पोलीस विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
            पोलीस गृहनिर्माण विषयक कामांचा आढावा घेऊन गृहनिर्माण महामंडळाला अधिकगतीने जालना येथील पोलीसांच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्याचे निर्देशही या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. प्रारंभी पोलीस अधीक्षक एस.चैतन्या यांनी सादरीकरणाद्वारे कामकाजाची माहिती दिली. बैठकीस सर्व पोलीस अधिकारी, अभियोक्ता उपस्थित होते.
*******







No comments:

Post a Comment