Thursday 1 November 2018

जलयुक्तच्या कामामुळे पीकांना नवसंजीवनी मात्रेवाडी गाव टँकरमुक्त जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला दुग्धव्यवसायामध्ये भरभराटी



            जालना, दि. 1 –  जिल्ह्यात शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देऊन जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात  येत आहेत.  जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा खंड असला तरी बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण, नजीकपांगरी व मात्रेवाडी या गावात जलयुक्तच्या पाण्यामुळे पीकांना नवजीवन मिळाले असुन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही भरभराटीस येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
            केळीगव्हाण येथील शेतकरी पंडित मदन  यांची एक एकर शेती असुन या शेतीवर डाळींबाची लागवड केली आहे तर सखाराम अंबादास मदन यांनी दीड एकर शेतीवर ऊस व टोमॅटो तसेच चारा पीकाची लागवड केली आहे. याच गावातील शेतकरी विष्णु मदन यांनी साडेचार एकरवर मोसंबीच्या 300 झाडांची बाग फुलवली असुन दहा टन डाळींबाचे उत्पादन या माध्यमातुन होणार असुन जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे येथील शेतकरी संतोष मदन यांनी सांगितले.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला
            दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येतो. परंतू केळीगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या कामांमुळे परिसरातील दीड किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या असलेल्या विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असुन यामुळे इतर पीकांच्या लागवडीबरोबरच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चारापीकांची लागवड करण्यात येऊन चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 
दुग्ध व्यवसायाला भरभराटी
            गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगल्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली असुन शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय भरभराटीस आला आहे.  गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी तसेच संकरित वाणाचे जनावरे असुन या माध्यमातुन दरदिवसाला सरासरी प्रत्येकी 20 ते  25 लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.  दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळाला असल्याची भावानाही शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.
            केळीगव्हाण गावाचे भौगोलिक क्षेत्र 714.91 हेक्टर एवढे असुन लागवडीयोग्य क्षेत्र 580.89 हेक्टर एवढे आहे.  गावामध्ये एकूण 227 एवढ्या विहिरी तर 14 बोअरवेल आहेत. गावात ठिबक/तुषार सिंचनाचे क्षेत्र 150 हेक्टर एवढे असुन सन 2016-17 या वर्षात गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदीखोलीकरण, सिमेंट नालाबांध, मातीनालाबांध, कंपार्टमेंट बंडीगची कामे करण्यात आली आहेत.  गावात मोसंबी पीकाचे 43 हेक्टर, कापुस 332 हेक्टर डाळींब 25.50 हेक्टर द्राक्ष 3 हेक्टर, सोयाबीन 96 हेक्टर, मका 44 हेक्टर, तूर 117 एवढे क्षेत्र असुन गावात दोन शेततळेही असल्याची माहिती कृषि पर्यवेक्षक पी.एस. इंदलकर व मंडळ  कृषी अधिकारी आर.जी.सुरडकर यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानामधील कामांमुळे मात्रेवाडी गाव टँकरमुक्त
            मात्रेवाडी गावामधून वाहणाऱ्या भोरडी नदीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन खोलीकरण करण्यात आल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.  तसेच यापूर्वी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता परंतू जलयुक्तच्या कामात झालेल्या पाण्याच्या संचयामुळे गाव टँकरमुक्त्‍ झाले असुन या गावाला जलमित्र पुरस्कारही मिळाला असल्याचे गावकऱ्यांसह कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सव्वाचार एकरवर फुलवली द्राक्षाची बाग
द्राक्षाच्या माध्यमातुन वीस लाख रुपयांचे उत्पन्न
            मात्रेवाडी गावातील शेतकरी लक्ष्मण दामोधर खडेकर या शेतकऱ्यांने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन संचय झालेल्या पाण्याच्या जोरावर त्यांच्याकडे असलेल्या सव्वाचार एकर जमीनीवर द्राक्षाची बाग फुलवली असुन या द्राक्षाच्या माध्यमातुन 20 लक्ष रुपयांची कमाई केली आहे.  त्याचबरोबर दाळींब या पीकाचीही लागवड करुन आदर्श अशी शेती केली आहे.  जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून त्याचा फायदा झाला. पूर्वी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करुन पीके जगवावी लागत होती.  परंतू एवढे करुनसुद्धा अपेक्षित उत्पादन होत नव्हते.  परंतू आजघडीला ही परिस्थिती बदलून अपेक्षापेक्षा अधिक उत्पादन होत असल्याची भावना   श्री  खडेकर यांनी बोलून दाखवली.






No comments:

Post a Comment