Monday 5 December 2022

सुजान व कर्तव्यदक्ष व्हा…! आपल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण करुन घ्या…!


 


 

बाल मृत्यू आणि त्यांच्यामधील आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे योग्यरितीने संपूर्ण लसीकरण करणे ही अत्यंत सोपी, कमी खर्चाची परंतू अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे. सध्या दिसून येणारा गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असला तरी हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे 5 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहनारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरिरावर लाल व सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. आपल्या कुटुंबातील 9 महिने ते 5  वर्ष वयोगटातील बालकांना गोवरची लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बालक लहानाचे मोठे होत असतांना 5 वर्षात 7 वेळा लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असून एकही लस सुटणार नाही याकडे पालकांना अत्यंत दक्ष राहून यापुढे लसीकरणाकडे गांभिर्याने पहावे लागेल. बालकांमधील क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फ्ल्युएन टाईप बी,पोलिओ, सबील गोवर व रुबेला या आजारांमुळे होणारे आजारपण व मृत्यू कमी करणे हे नियमित लसीकरण कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

लसीकरण कार्यक्रमांतर्गत बीसीजी लस क्षयरोगाकरीता, डीटीपी लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला या आजारांकरीता, पोलिओ लस पोलिओ आजारांकरीता, गोवर-रुबेला लस गोवर व बेला आजारांकरिता हिपॅटायटिस बी लस काविळ आजारांकरिता व पेंटाव्हॅलंट लस ही घटसर्प, धनुर्वात, डांग्‌या खोकला, हिमोफिलस इन्फलुएन्झा टाईप बी व कावीळ आजारांकरीता, प्रतिबंधात्मक साधन म्हणुन उपयोगात आणल्या जातात.  लसीकरण कार्यक्रमासाठीचे अनुदान केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत प्राप्त होते. कार्यक्रम अंमलबजाणीसाठी आवश्यक लसी व ए.डी. सिरीज यांचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जातो. 

सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसेच वाय संपर्क कार्यक्षेत्रात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते व लाभार्थींना लसी दिल्या जातात. लसींची क्षमता टिकून राहण्यासाठी लसींची वाहतूक शीतसाखळी अबाधित ठेवून करण्यात येते. जापनिज एन्सेफेलायटिस लस ही जापनिज एन्सेफेलायटिससाठी देण्यात येते. राज्यात राष्ट्रीय नियमित लसीकरण कार्य्रमांतर्गत पेंटाव्हॅलेन्ट लसीचा समावेश दि. 22 नोव्हेंबर 2015 रोजी करण्यात आला आहे. या लसीमुळे घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फलुएन्झा टाईप बी व कावीळ या 5 आजरांना व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना प्रतिबंध होणार आहे.

            लसीकरणामुळे टाळता येणा-या आजाराने होणाऱ्या बाल मृत्यूचे व आजाराचे प्रमाण लसीकरणाने कमी करणे, बालकांचे योग्य वयात लसीकरण पूर्ण करणे हे लसीकरण कार्यक्रमाचे उद्दीष्टे आहेत. राज्यात सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, आणि निमशासकीय संस्था यांच्यामार्फत लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. आपल्या जवळच्या सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये सर्व लसी मोफत दिल्या जातात. तरी आरोग्य सेविका, आशा किंवा अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून बाळाचे संपूर्ण लसीकरण करुन घ्यावे. बालकांचे नियमित लसीकरण हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, जालना

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment