Friday 23 December 2022

सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा संपन्न शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे पार पाडत जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन द्यावी -जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

 

 

जालना, दि.23 (जिमाका) :-   आपण जनतेच्या कामासाठी शासकीय सेवेत आलो आहोत, ही भावना सदैव मनात ठेवून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिस्त व जबाबदारीने कामे पार पाडत जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.

 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत दि. 19 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की और’ साजरा करण्यात येत आहे. सुशासन सप्ताहानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सुशासन पध्दती/उपक्रमांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, सुशासनाचा मुख्य केंद्रबिंदू नागरिक हा आहे. त्याच्या सेवेसाठीच आपण कार्यरत आहोत, त्यामुळे प्रत्येक काम शिस्तबध्दपणे व मनापासून करुन उत्तमोत्तम सेवा नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्यात. आपल्या कामाप्रती आस्था ठेवत जास्त वेळ काम प्रलंबित राहणार नाहीत, ती वेळेत निकाली लागतील या भावनेने कामे करावीत. सध्याच्या युगाशी सुसंगत होण्यासाठी सर्व नोकरदारांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा कार्यालयीन वापर करण्यावर भर द्यावा. ‘प्रशासन गाव की और’ या थीमनुसार कामे करत शेवटच्या घटकांना सेवेचा लाभ देण्यासाठी नेहमी तत्परता बाळगावी व शिस्तप्रिय नोकरदार बनून सर्व जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी कृषी, अकृषीक, भोगवटदार जमीनीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी रस्ते अपघात व सुरक्षितता व वाहतुकीच्या नियमांचे पालनाबाबत माहिती दिली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी प्रदीप भोगले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत सविस्तर मार्गर्शन केले. तर समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी थोडेसे मायबापसाठी  पण या उपक्रमाची माहिती दिली. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी गजानन म्हस्के यांनी आयुष्यमान भारत योजनेसह  माता व बालकांचे लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.  कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक श्रीमती भोसले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती मोरे यांनी केले तर आभार तहसिलदार संतोष गोरड यांनी मानले.  कार्यशाळेस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment