Wednesday 7 December 2022

बालकांना गोवरची लस तातडीने देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन निदान झालेले एकूण रुग्ण गोवर-5, रुबेला-1

 


 

जालना, दि.7 (जिमाका) :-  गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे 5 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहनारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरिरावर लाल व सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्यकर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होवू शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेला सारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. आपल्या कुटुंबातील 9 महिने ते 5  वर्ष वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने देण्यात यावी. लसीकरण मोहिमेस सर्व प्रकारे सहकार्य करणे आवश्यक आहे. असे  आवाहन आरोग्य विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

गोवर प्रभावित भागातील कार्याचा प्रगतीपर तपशिल-  व्हिटॅमिन-ए ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या 42 (संशयीत गोवर रुग्ण) असून गोवर रुबेला लसीकरण सर्वेक्षणात 4632 बालके आढळुन आली यात पहिला डोस देण्यात आलेली 2035 तर लसीकरण न झालेली बालके 2462 अशी आहेत. तसेच दुसरा डोस देण्यात आलेली बालके 1580 तर लसीकरण न झालेली बालके 2170 अशी आहेत.

जिल्ह्यात 96 संशयीत रुग्ण असून 5 गोवर (तालुकानिहाय रुग्णांचीसंख्या जालना-3, जाफ्राबाद-1 व बदनापूर-1) व 1 रुबेला (बदनापूर-1) निदान झालेली रुग्ण संख्या आहे. यात एकही मृत्यू झालेला नाही (दि.6 ‍डिसेंबर 2022 पर्यंत) अशाप्रकारे एकुण रुग्णांची संख्या 6 अशी आहे. जिल्हास्तरावर एकुण गोवर रुबेला लस साठा 700 इतका साठा आहे. गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनातंर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती नियमित आढावा बैठक घेण्यात येते. निश्चित निदान झालेल्या भागात घरोघरी लसीकरण सुरु आहे. कुपोषित बालकांची माहिती घेवून त्यांच्यावर विशेष लक्ष  उपचारात्मक पोषण, जीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण केले जाते. घरोघरी गोवर रुग्ण सर्वेक्षण केले जाते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment