Wednesday 7 December 2022

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी-2022 संकलनाचा शुभारंभ सर्वांनी ध्वजदिन निधीत सढळ हाताने मदत करुन भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी - निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके

 


 







       जालना दि. 7 (जिमाका) :-  भारत देशाच्या सुरक्षेससाठी आपले सैनिक रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देत असतात. त्यांच्यामुळेच आपण स्वातंत्र्याचा खरा आनंद देशामध्ये घेत आहोत. तरी आपल्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त करणे गरजेचे असून सर्वांनी ध्वजदिन निधीमध्ये सढळ हाताने मदत करुन आपल्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले.

         सशस्त्र सेना ध्वजदिन-2022 निधी संकलनाचा शुभारंभाचा कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,  येथे दि.7 डिसेंबर 2022 रोजी पार पडला, यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक पराग नवलकर, शिक्षणाधिकारी मंगला धुपे,  कार्यालय अधिक्षक शरद तोटे, सहा.प्रशासकीय अधिकारी गोपाल कुलकर्णी, विक्रांत शिरभारते, पी.बी.वरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नेटके म्हणाले की, ध्वजदिन निधी हा दिवस ब्रिटीश राजवटीमध्ये पॉपी डे म्हणून साजरा करण्यात येत होता परंतू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने या दिनाला ध्वजदिन म्हणून साजरा करण्याचा ‍निर्णय घेतला. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळला जातो. 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या 30 नोव्हेंबरपर्यंत या दिनाच्या निमित्ताने आपण शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्याकडून देणगीच्या स्वरुपात निधी  संकलित करतो. ध्वजदिन निधी 2021 करिता महाराष्ट्र शासनाने आपल्या जालना जिल्ह्यास 38 लक्ष 30 हजार रुपयांचे उद्दीष्ट दिले होते आणि पुणे सैनिक कल्याण विभागाकडून 33 लाख 50 हजार 670 रक्कमेचे साहित्य वाटपासाठी  प्राप्त झाले होते. तरी आपण जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहकार्याने एकुण 221 टक्के उद्दीष्ट साध्य केले आहे.

        ध्वजदिन निधीतून माजी सैनिकांच्या पुनर्वसनाचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाचे अनेक कार्यक्रम राबविले जातात. ध्वजदिन निधी संकलनाच्या एकुण निधीपैकी 60 टक्के निधी हा कल्याणकारी निधीमध्ये माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी वापरला जातो. कल्याणकारी निधीमधून राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनेतून मुलीच्या विवाहाकरिता आर्थिक मदत तसेच माजी सैनिक, विधवांच्या पाल्याकरिता शैक्षणिक, व्यावसायिक शिक्षणाच्या खर्चाची परिपुर्ती, शिष्यवृत्ती , संगणक खर्च, मेस्को ट्रेनिंग खर्च, अत्यंविधी, विशेष गौरव पुरस्कारासाठी खर्च केला जातो. घरबांधणी किंवा सदनिका खरेदीसाठी माजी सैनिक, विधवांना आर्थिक मदत करण्यात येते. स्वयंरोजगारासाठी घेतलेल्या कर्जावर 3 लाखापर्यंत माजी सैनिक, विधवांना तसेच त्यांच्या बचत गटाकरिता 10 लाख रुपयांपर्यत मदत  दिली जाते. या निधीचा वापर हा माजी सैनिकांच्या मुलां-मुलींसाठी वसतिगृह खर्च प्रतिपूर्ती तसेच वसतिगृहे व माजी सैनिकांरिता विश्रामगृहे बांधण्यासाठी खर्च केला जातो. जालना येथे सैनिकी मुलांचे वसतिगृह असून यामध्ये 40 मुलांची क्षमता आहे. असे सांगून जिल्ह्यामध्ये माजी सैनिक आणि विधवांची एकुण संख्या 1 हजार 644    एवढी आहे.  भारताच्या संरक्षण दलातून 34 ते 45 या वयोगटातील आपले जवान सेवानिवृत्त होत असतात. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना माजी सैनिक म्हणून गणण्यात येते व त्यानंतर त्यांचे व त्यांच्या अवलंबितांचे कल्याण व पुनर्वसनाची संयुक्त जबाबदारी ही केंद्र व राज्य शासन घेत असते. राज्य शासनामध्ये माजी सैनिक व विधवांचे कल्याण आणि पुनर्वसनाची काळजी प्रत्येक जिल्ह्याची व पर्यायाने सर्वांची आहे. माजी सैनिकांच्या बहुतांश समस्यांचे समाधान जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे नियोजनपूर्वक पार पाडले जात असल्याबाबत समाधानही त्यांनी व्यक्त केले.

         कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सध्याच्या संगणकीय युगात प्रचलित डिजीटल व्यवहार लक्षात घेता ध्वज दिन निधीच्या खात्याचे क्युआर कोड स्कॅनचे अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष गौरव पुरस्कारात इयत्ता दहावीमध्ये 94.20 टक्के गुण मिळाल्याबाबत कु. अक्सा एजाज अजिम शेख व इयत्ता बारावीमध्ये 92.83 टक्के गुण प्राप्त केल्याबाबत कु.श्रध्दा संतोष लकडे या दोन विद्यार्थ्यींनी 10 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर शहीद हवालदार पंडितराव लहाने यांच्या वीरपत्नी लिलाबाई लहाने व शहीद शिपाई सुरेश कदम यांचे वीरपिता केशवराव  कदम आणि शहीद शिपाई चंद्रकांत सुळे यांच्या वीरपत्नी उज्वला सुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली कानडे व शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांची समयोचित भाषणे झाली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद इंगोले यांनी केले तर आभार कल्याण संघटक श्रीराम सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास पार्थ सैनिकी शाळेचे विद्यार्थी, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या विद्यार्थींनी, आजी माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, शिक्षक व ध्वजदिन निधीचे उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment