Tuesday 6 December 2022

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला विविध कामांचा आढावा

 


जालना दि. 6 (जिमाका) :- राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री  अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पाणीपुरवठयाची कामे, घरकुल योजना, जिल्हा क्रीडा संकूलची कामे आदीं कामांचा आढावा घेतला.

बैठकीस आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीनाआदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी  पाणी पुरवठयाची कामे गतीने पूर्ण करावीत. विशेषत:  हर घर नल, हर घर जल अंतर्गतची कामे दिलेल्या वेळेच्या उदिष्टानुसार पूर्ण करण्यात यावीत. या कामात अजिबात विलंब करण्यात येऊ नये. याशिवाय कायमस्वरुपी पाणी पुरवठा होण्यासाठी प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्यात यावा.  समाजकल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांची कामेही तातडीने व पारदर्शकपणे पूर्ण करावीत. अतिरिक्त तीन हजार घरकुल योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाची कार्यवाही  वेळेत पूर्ण  करुन कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी.  मी स्वत: क्रीडा संकुलाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कुठल्याही कामात कुचराई करण्यात येऊ नये. कामात  अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार नारायण कुचे यांनी शहर व गावांतील नागरिकांना कायमस्वरुपी पाणी मिळण्यासाठी वॉटरग्रीडची संकल्पना राबविण्याची यावेळी मागणी केली.

जलनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर जल अंतर्गत कामे  मार्च-2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्द‍िष्ट आहे. 55 लिटर प्रति दिन दरडोई नुसार पाणी पुरवठा करण्याचे धोरण आहे. सर्व योजना 30 वर्षाकरीता संकल्पित आहेत. केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी 50 टक्के निधी आहे. कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी यावेळी दिली.

***

No comments:

Post a Comment