Monday 12 December 2022

प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानतंर्गत कार्यक्रम जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी प्रशासन क्षयरुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड क्षयरोग मुक्तीसाठी उद्योजकांचा विशेष पुढाकार

 




  

          जालना दि. 12 (जिमाका) : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान देशात राबविण्यात येत असून या माध्यमातून वर्ष 2025 पर्यंत शुन्य क्षयरोग रुग्ण संख्या करण्यात येणार आहे. जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या माध्यमातुन सामाजिक दायित्वाअंतर्गत विक्रम टीने राबविलेला एकाचवेळी जिल्ह्यातील उपचाराखालील 100 टक्के क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार किट वितरणाचा कार्यक्रम हा देशातील पहिलाच कार्यक्रम आहे. जालना जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी क्षयरुग्णांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभे आहे तसेच उद्योजकही टीबीमुक्तीसाठी हिरिरीने पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांचे कार्य निश्चितपणे कौतूकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली.

            विक्रम टी प्रोसेसर प्रा.लिमिटेड व जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट वितरण कार्यक्रम विक्रम टी  कंपनीच्या परिसरात बोरखेडी माळाचा गणपतीजवळ जालना येथे आज आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लिमिटेडचे रमेशभाई पटेल व भावेशभाई पटेल, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, जिल्हा क्षयरोग अधिकारी अश्वमेध जगताप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यातील उद्योजक सर्व सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवित असतात. कोविड काळात उद्योजकांनी ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले त्यामुळेच आपण इतर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करु शकलो. जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरुणांना कोरडा पोषण आहार किटचे वाटप करण्याबाबतच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील उद्योजकांनी पुढील 3 वर्षापर्यंत पोषण आहाराचे वाटप करण्यासाठी नियोजन केले आहे. क्षयरोग हा पुर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यासाठी प्रथम औषधांचे नियमित सेवन 6 किंवा 9 महिन्यापर्यंत करावे लागत असून यासोबतच या रुग्णांना चांगला पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. जालना जिल्हा पुर्ण शक्तीनिशी आपल्या पाठिशी असून क्षयरोग मुक्तीसाठी रुग्णांनी वेळेत योग्य संतुलित आहार घेवून क्षयमुक्त व्हावे असे सांगून ''अपना देश जिताना है, टी.बी. को हराना है'' अशी जोशपुर्ण घोषणा देत उपस्थित क्षयरुग्णांचे मनोबलही त्यांनी यावेळी वाढविले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, क्षय रुग्णांना औषधोपचाराबरोबरच पोषणाची खुप आवश्यकता असते या उद्देशाने जिल्ह्यातील उद्योजक एकत्र येवून क्षयरुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट वितरण कार्यक्रम आयोजित करतात ही खुप कौतूकास्पद बाब आहे. जालना जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी सर्व रुग्णांनी वेळोवेळी औषधोपचारास सहकार्य करावे, असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.

            प्रास्ताविकात जिल्हा क्षयरोग अधिकारी अश्वमेध जगताप यांनी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून भारत टीबीमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी निक्क्षय मित्रांची आखणी केली गेली आहे. टीबी न राहण्यासाठी जे मदत करतील ते निक्क्षय मित्र होय, असे सांगुन त्यांनी क्षयरोग मुक्तीसाठी शासनस्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

विक्रम टीचे रमेशभाई पटेल म्हणाले की, जिल्हा प्रशासन व उद्योजक या सर्वांच्या सहकार्यामुळेच पोषण आहार वाटपाचा कार्यक्रम पुर्ण होवू शकला. प्रधानमंत्री यांचे क्षयरोग मुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी औषधोपचारासोबतच प्रोटीनयुक्त आहार घेत जालना जिल्हा क्षयरोगमुक्त करावा, असे रुग्णांना आवाहनही यावेळी केले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात क्षयरुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किटचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक रोडिया यांनी केले तर आभार किशोर आगाम यांनी मानले. या कार्यक्रमास विक्रम टी परिसराचे काजलबेन पटेल, प्राप्तीबेन पटेल, शुभम पटेल, भावेशभाई पटेल, ताराबेन पटेल यांच्यासह जिल्ह्यातील  क्षय रुग्ण व संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात टीबीचा शोध लावणारे रॉबर्ट कॉक्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

जालना जिल्ह्यात क्षयरोग उपचाराखालील रुग्णांची एकुण संख्या 1 हजार 391 एवढी आहे. एकुण निक्क्षय मित्रांची सुख्या 22 अशी आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment