Monday 5 December 2022

अंकुशराव टोपे महाविद्यालयात 270 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

 


           

जालना, दि.5 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 25 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार संविधान दिन दि. 26 नोव्हेंबर ते भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दि. 6 डिसेंबर 2022 हा कालावधी समतापर्व म्हणून घोषीत केला आहे. या समतापर्व कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या कार्यालयाने समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवून कागदपत्रे परिपूर्ण असलेल्या 270 प्रकरणात अर्जदाराचा जातीदावा वैध ठरविला. या मोहिमेमध्ये जातीदावा वैध ठरलेल्या 270 अर्जदार विद्यार्थ्यांना दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष महेंद्र हरपाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित तसेच उपप्राचार्य संजय पाटील, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालनाचे उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव  प्रदिप भोगले, प्रकल्प अधिकारी समतादुत  मुंजाजी कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कार्यक्रमाचे अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  महेंद्र हरपाळकर यांनी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपध्दतीबाबत तसेच जात पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याऱ्या विदयार्थांना  आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या  मंडणगड पॅटर्न ची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या पॅटर्ननुसार आता इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थांना त्यांच्या महाविद्यालयातूनच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित महाविद्यालयात तातडीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना केले.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या समितीच्या उपायुक्त वैशाली हिंगे यांनी केलेल्या प्रस्ताविकामध्ये मंडणगड पॅटर्नबाबत सविस्तर माहिती विशद करुन समितीने समतापर्वामध्ये राबवलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.  कार्यक्रमासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थांच्या पालकांचे प्रतिनिधी म्हणून रंगनाथ वाटाणे, प्रा. प्रल्हाद वाघ, श्री. ब्रम्हानंद तायडे यांनी तसेच काहि विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीच्या विधी अधिकारी ॲङ श्वेता कांबळे यांनी केले. असे उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment