Friday 16 December 2022

चला जाणुया नदीला अभियानासाठी नदीपात्रालगतच्या गावात ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश

 


                जालना दि. 16 (जिमाका) :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'चला जाणुया नदीला' या अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तर 'चला जाणुया नदी' अंतर्गत जिल्ह्यातील कुंडलिका, सिना, जिवरेखा व दुधना या नदीपात्रालगतच्या गावांसाठी अभियानाची  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता समिती गठीत करण्याची सुचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जालना व भोकरदनचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या नागरीकरण आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भुपृष्ठाजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता, साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणुन घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील शासन निर्णयान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अंतर्गत जिल्ह्यातील कुंडलिका, सिना, जिवरेखा व दुधना, नदीपात्राच्या गावालगतच्या गावांसाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे यामध्ये समिती अध्यक्ष सरपंच हे पदसिध्द अध्यक्ष असतील तर उपसरपंच हे पदसिध्द सदस्य, ग्रामपंचायत सदस्यात पुरुष 1 व महिला 1 असे 2 सदस्य, प्रगतशील शेतकरी  (प्रवर्गात सर्वसाधारण-1, अनुसूचित जाती, अ.जमाती-1 विमुक्त जाती, भटक्या जमाती-1) 2 सदस्य, महिला शेतकरी प्रवर्गात सर्वसाधारण -1, अनुसूचित जाती/ अ. जमाती -1, विमुक्त जाती/भटक्या जमाती-1 याप्रमाणे 3 सदस्य, शेतकरी उत्पादक गट किंवा कंपनी प्रतिनिधी प्रवर्गात 1 सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी 1 सदस्य आणि कृषी पुरक व्यावसायिक शेतकरी 2 सदस्य असे एकुण 13 कार्यकारी सदस्य असतील.

अकार्यकारी सदस्यात कृषी सहायक हे पदसिध्द तांत्रिक सदस्य, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव, समुह सहाय्यक हे सह सचिव, कृषी मित्र / नदी समन्वयक हे विस्तार कार्य प्रेरक अशा प्रकारे प्रत्येकी एकाचा समावेश असणार आहे. याप्रमाणे  प्रत्येक गावासाठी समिती गठीत करण्यात यावी. या समीतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या उपक्रमाबाबत कामकाज करावयाचे आहे. तरी वरीलप्रमाणे समिती गठीत करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्राद्वारे दिले आहेत.  

                                                                   -*-*-*-*-

No comments:

Post a Comment