Tuesday 14 February 2023

जालना येथे राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा --- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 







जालना, दि. 14 (जिमाका) :-  खेळाडुंनी सांघिक भावनेने खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन  विजय संपादन करावा. तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा- महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तर (17 वर्षाखालील मुले व मुली ) शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

यावेळी  महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव गोकुळ तांदळे, पंचप्रमुख तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन, बीडचे अध्यक्ष प्रा. दिनकर थोरात, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन बीडच्या कार्याध्यक्ष डॉ. कविता कराड, क्षितीजा गव्हाणे, शिवाजी एज्युकेशन सोसायटी, नाव्हाचे अध्यक्ष विठ्ठलराव म्हस्के,  क्रीडा मार्गदर्शक महंमद शेख, संतोष वाबळे, क्रीडा संघटक  प्रशांत नवगिरे ,  पी . जे . चाँद ,  प्रमोद खरात , देवगिरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या  गायत्री सोरटी , पंच  गणेश बेटुडे ,सुजय कल्पेकर, ईश्वरी शिंदे , मयुरी चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी मशालवाहक सॉफ्टबॉल स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू विशाल उबाळे हे उपस्थित होते. दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणाऱ्या या  स्पर्धेसाठी राज्यातून मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे, लातूर, अमरावती, नागपूर व औरंगाबाद या आठ विभागातून मुले व मुली खेळाडू,  संघ मार्गदर्शक व व्यवस्थापक, पंच अधिकारी, आयोजन समिती सदस्य, राज्य संघटना पदाधिकारी हे उपस्थित राहिले आहेत. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाना प्राविण्याचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार असून इतर सर्व सहभागी खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी खेळाडुंचा जिल्हाधिकारी यांनी परिचय करुन घेत सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सचिव, जिल्हा क्रीडा परिषद अरविंद विद्यागर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा  क्रीडा संघटक तथा शिक्षक प्रशांत नवगिरे यांनी केले. क्रीडा मार्गदर्शक  तथा स्पर्धा प्रमुख महंमद शेख यांनी आभार मानले. स्पर्धेकरीता पंच म्हणून प्रसन्नजित बनसोडे, पंकज शेलोटकर, मंदार कुलकर्णी,  अक्षय बिराजदार,  संतोष  आवचार, किशोर काळे, श्रीकांत पांडे, श्रीराम इंगळे, शरद आंदुरे हे काम पहात आहेत.

***

No comments:

Post a Comment