Tuesday 21 February 2023

जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावे -- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 


जालना, दि. 20 (जिमाका) – जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे शुध्द पाणी पुरवठा करणे (हर घर नल हर जल) ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्हयात 6 तालुक्यांत 634 योजनांची निवड करण्यात आली आहे. संबंधित विभागाने दर्जेदार पध्दतीने या योजनांची कामे पूर्ण करुन घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी आपल्या गावात या योजना कशा चांगल्या पध्दतीने होतील, याकडे स्वत: लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेचा ग्रामीण पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्यावतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्हयातील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई-उदघाटन सोहळा श्री. पाटील यांच्या हस्ते जालना येथील पोलीस क्रीडा मैदानावर आज संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीव्दारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरटंयाल, आमदार संतोष दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, मानवी जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्त्व असून मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाणी पुरवठा योजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी कामाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील घरात नळाव्दारे शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाव्दारे मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजना सोलारवर राबविण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. गाव पातळीवर सरपंचांनी जल जीवन मिशनच्या कामात स्वत: लक्ष घालून अधिक गतीने व चांगले काम करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा नियमित आढावा घ्यावा. कुठल्याही कामाला मी स्वत: अचानक भेट देईल.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या संकल्पनेतून 2019 पासून केंद्र शासनाद्वारे जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील ५५ लिटर प्रति माणसी प्रती दिन पाणीपुरवठा करण्याचे धोरण या योजनेचे आहे. जालना जिल्ह्याचा जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद च्या मंजूर कृती आराखडा अंतर्गत ७१९ गावांकरिता ६९७ योजना मंजूर असून त्याची एकूण किंमत रुपये ४८५ कोटी आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे ७ योजना आहेत ज्यामध्ये २ ग्रीड पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. या योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. ते म्हणाले की, एकेकाळी जालना जिल्हा एक टँकरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात होता. ही ओळख आता पुसल्या जात आहे. या वर्षी वार्षिक सरासरीच्या १४३.३५ टक्के पाऊस झाला आहे. सर्व प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०१९ पासून केंद्र शासनाद्वारे जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना देशात राबविण्यात येत आहे. हर घर नल हर घर जल हे त्याचे ब्रिदवाक्य आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक गावातील ५५ लिटर प्रति माणसी प्रती दिन पाणीपुरवठा करण्याचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना ही ३० वर्षाच्या संभाव्य लोकसंख्येकरता संकल्पित करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचा जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद च्या मंजूर कृती आराखडा अंतर्गत ७१९ गावांकरिता ६९७ योजना मंजूर असून त्याची एकूण किंमत रुपये ४८५ कोटी आहे. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे ७ योजना आहेत ज्यामध्ये २ ग्रीड पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. या योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के निधी मिळणार आहे. समाविष्ट गावाला योजनेच्या किमतीच्या १० टक्के लोक वर्गणी जमा करावयाची असून हा निधी योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्ती करीता वापरावयचा आहे. सदरील कार्यक्रम हा व्यापक स्वरूपाचा असल्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असणारे अपुरे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून WAPCOS Limited या सहाय्य संस्थेची शासनाकडून निवड झाली आहे. सदर संस्थेने पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक पर्यवेक्षण करणे इत्यादी कामे करावयाची आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामे ही गुणवत्तापूर्वक व चांगल्या दर्जाची व्हावी याकरिता शासनाने योजनेची त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक केली आहे. आजच्या समारंभामध्ये ६ तालुक्यांतील (अंबड, घनसावंगी, जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद)जिल्हा परिषदेकडे असलेल्या योजनांपैकी ६२७ व - मजीप्रा कडील ७ योजनांची निवड करण्यात आली आहे. यासाठी एकूण किंमत रु. ५५९.१२ कोटी खर्च लागणार आहे. आभार श्रीमती वर्षा मीना यांनी मानले.
जल जीवन मिशनअंतर्गत मौजे अकोला (नि) व धोपटेश्वर
येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बदनापूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत मौजे अकोला (नि) येथील 1 कोटी 9 लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच धोपटेश्वर येथील जलजीवन मिशन अंतर्गत 93 लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाऊसाहेब घुगे, अकोला गावच्या सरपंच रुख्मिनबाई केकान, धोपटेश्वर गावचे सरपंच ताराचंद फुलमाळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्री. रबडे, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-










No comments:

Post a Comment