Tuesday 14 February 2023

दहावी व बारावी परिक्षा; भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पाडाव्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवा विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन प्रामाणिकपणे परिक्षा द्यावी -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 




 

जालना, दि. 14 (जिमाका) :-  आगामी दहावी-बारावी परिक्षा या भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात संपन्न होण्यासाठी जालना जिल्हयात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे. परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार  होणार नाही, याची दक्षता भरारी पथक, केंद्रप्रमुख, शिक्षकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. तसेच भारताचे सक्षम नागरिक होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

फेब्रुवारी/मार्च-2023 या कालावधीत इ. 10 वी इ. 12 वी च्या परिक्षा होणार आहेत. या काळात परिक्षा केंद्रावर होणारे  गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या  यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थाचालक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व भरारी पथके, गटशिक्षणाधिकारी यांची  दक्षता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, शिक्षणाधिकारी (मा) मंगल धुपे, शिक्षणाधिकारी (प्रा) कैलास दातखिळ  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयात दहावीसाठी 100 आणि बारावीसाठी 80 परिक्षा केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर बैठक पथक असणार आहेत. पोलीस विभागामार्फत प्रत्येक केंद्रावर पोलीस किंवा होमगार्डच्या स्वरूपात संरक्षण उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर कमीतकमी एक तास अगोदर पोहोचावं, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.   जिल्ह्यात 18 भरारी पथक असणार आहेत.  त्यामध्ये जिल्हास्तरीय अधिकारी असतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी कोणत्या दिवशी कुठे जायचं ते त्यांना ऐनवेळी कळविली जाईल. याबाबत संपूर्णत: गुप्तता पाळण्यात येईल. महत्त्वाच्या पेपरच्या दिवशी मी स्वत:, सीईओ आणि पोलीस अधीक्षक कुठल्याही परिक्षा केंद्राला अचानक भेटी देणार आहोत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, परिक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहतील, याची दक्षता घ्यावी. दहावी आणि बारावीची परीक्षा आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी आपण पार पाडणार आहोत. संस्थाचालकांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाचा निकाल चांगला यावा म्हणून कुठल्याही गैरप्रकारास प्रोत्साहन देऊ नये. गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.    भारताचे सक्षम नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच प्रामाणिकपणे परीक्षा द्याव्यात. मी अजूनही कुठलाही कॉपी केलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी झालेला पाहिलेला नाही. कष्ट आणि जिद्यीने विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, कॉपीला आळा घालण्यासाठी आपल्या सर्वांना एक टीम म्हणून काम करायचे आहे. परिक्षा काळात कुठेही कॉपी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुठे गैरप्रकार आढळल्यास तात्काळ आम्हाला कळवावे. जेणेकरुन तात्काळ कारवाई केली जाईल.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे म्हणाले की, परिक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल. परिक्षा केंद्रांच्या परिसरात पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन दिला जाईल. परिक्षेशी संबंधित सर्वांनीच पुरेशी खबरदारी घेतल्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.

***

No comments:

Post a Comment