Friday 24 February 2023

दहावी व बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या खेळाडुंनी गुणवाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत

 


 

जालना, दि.24 (जिमाका) :- राज्य मंडळ सचिवांचे दि. 12 डिसेंबर 2022 रोजीचे तसेच औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिवाचे दि.2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या पत्रातील निर्देशानूसार गुणवाढीसाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तरी  जालना जिल्ह्यातील संबंधित सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी व बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंचे गुणवाढीसाठीचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात बुधवार    दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या आणि जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.20 डिसेंबर 2018 व 25 जानेवारी, 2019 अन्वये अनुक्रमे 5 ते 25 गुण देण्यात येत असतात. राज्य मंडळाच्या दि. 12 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार प्रति विद्यार्थी 25 रुपये छाननी शुल्क, बँक चलनाद्वारे किंवा रोखीने भरणा करुन प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. या प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार कमी अधिक बदल झाल्यास संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह शारीरिक शिक्षकांमार्फत दि. 5 एप्रिल, पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्याकडे सादर करावेज. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत किंवा मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment