Friday 3 February 2023

जालना येथे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

 


जालना दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन-2023 या नवीन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. तरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता थेट मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत दुसरा मजला, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये  सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा  निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.  

जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांचे कार्यालयात बुधवार दि. 8 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.  एन.आर.बी. बेरिंग्स लि. जालना यांची दहावी/बारावी उत्तीर्ण करीता  ट्रेनी 20 पदे आणि फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रा. लि. जालना यांची दहावी आणि आयटीआय फिटर,टर्नर, वेल्डरसाठी 8 पदे, तसेच पदवीधरासाठी ट्रेनी 3 पदे अशी एकूण 31 रिक्त पदांचा तपशील  प्राप्त झाला आहे. या दिवशी नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक  लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम औरंगाबाद विभाग  व नंतर जालना जिल्हा निवडून त्यातील 'स्पेशल जॉब फेयर-2 जालना' याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह  छायाचित्र आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment