Monday 13 February 2023

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 4 हजार 140 प्रकरणे निकाली 11 जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार करण्याचा घेतला निर्णय

 


 

जालना, दि. 13 (जिमाका) :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना जिल्हा सत्र न्यायालय,  जालना व जिल्हा वकील संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेश अनादरण संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपुर्व वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, बी.एस.एन.एल.ची दावा दाखल पुर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या लोक अदालतमध्ये दावा दाखल पूर्व 3 हजार 113 प्रकरणे निकाली निघाली व या प्रकरणात तडजोड रक्कम 2 कोटी 32 लाख 84 हजार 275 रुपये एवढी झाली.

न्यायालयातील प्रलंबीत 438 प्रकरणे निकाली निघाली व या प्रकरणात तडजोड रक्कम 6 कोटी 52 लाख 72 हजार 84 रुपये एवढी झाली. तसेच विशेष मोहिमे अंतर्गत 589 प्रकरणे निकाली निघाली. अशाप्रकारे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये  4 हजार 140 प्रकरणे निकाली निघाली. सदर प्रकरणात तडजोड रक्कम 8 कोटी 85 लाख 56 हजार 359 एवढी झाली. या लोकअदालतीसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी 11 पॅनल ठेवण्यात आले होते. त्यावर पॅनल प्रमुख म्हणून सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले.

लोकअदालतमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती व्ही. एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश-1 श्रीमती ए.डी. देव, व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती पी.पी. भारसाकडे, व सर्व न्यायाधीश तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. बाबासाहेब इंगळे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ ॲड. रामेश्वर गव्हाणे, वकील संघाचे सर्व मान्यवर विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.        कौटुंबिक न्यायालय, जालना येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकुण 16 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधील 11 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवुन घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा  संसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅनल सदस्य म्हणुन मान्यवर विधीज्ञांनी काम पाहिले तसेच सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment