Tuesday 21 June 2022

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा निरोगी जीवन व ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास करावा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 








            जालना, दि. 21 (जिमाका):- योगाच्या माध्यमातुन मानवाला लवचिकता व स्थैर्य प्राप्त होत असते.  या दोनही बाबींच्या माध्यमातुन आत्मविश्वास प्राप्त होऊन कुठल्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठता येणे शक्य असल्याने प्रत्येकाने नित्यनेमाने योगाभ्यास करुन निरोगी जीवन प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांनी केले.

              जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा परिषद, आरोग्य व शिक्षण विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  जिल्हा क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी योग प्रात्यक्षिके करत हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 

            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, डॉ. प्रताप घोडके, डॉ. जयश्री भुसारे, शिक्षणाधिकारी (मा) श्रीमती मंगल धुपे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला दिलेली योग ही एक वैश्विक देणगी आहे. नियमित योगाभ्यासामुळे समाधी, जोड आणि सामंजस्य याबरोबरच निरोगी राहण्याचा मार्ग मिळतो.  लचचिकता व स्थैर्याच्या माध्यमातुन आत्मविश्वास निर्माण होण्यामध्ये योगाचा फार मोठा वाटा आहे. आयुष्यात आपले ध्येयप्राप्तीसाठी निरोगी शरीर तसेच आत्मविश्वास निर्मितीसाठी प्रत्येकाने नित्यनेमाने योग्याभ्यास करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी योगगुरु मनोज लोणकर व अंजली लोणकर व वैष्णवी साळुंके यांनी अनेक योगासनांची प्रात्यक्षिके करुन दाखवली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, कर्मचारी व नागरिकांनीही प्राणायाम व योगासने करुन योग दिन उत्साहात साजरा केला. योगदिनानिमित्त आयोजित योगस्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना अरविंद विद्यागर, यांनी केले यावेळी केरसिंग पवार, जिल्हा संघटक, स्काऊट गाईड विभाग, जालना, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक, विविध संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सह योगार्थी तसेच क्रीडा अधिकारी,डॉ. रेखा परदेशी, महेश खर्डेकर, महमद शेख, संतोष वाबळे, संतोष प्रसाद, सोपान शिंदे, राधा कांबळे, हारूण खान, सिमोन निर्मळ आदींची उपस्थिती होती.

                                                         -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment