Thursday 9 June 2022

सदगुरु स्वयंसहाय्यता बचतगटाची गरुडझेप कुक्कूटपालन व अगरबत्ती व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल

 




 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जालना तालुक्यात वडगाव येथील रहिवाशी श्रीमती संगिता राजू राठोड यांनी केवळ जिद्द, चिकाटी व अपार मेहनतीच्या जोरावर बचतगटाच्या माध्यमातुन कुक्कुट पालन व अगरबत्ती व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल करत महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

जालना मुख्यालयापासुन 25 किलोमीटर अंतरावर वडगाव वसलेले आहे. गावाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे शेतीच. शेतीतील उत्पादनावर अवलंबून असलेल्या या गावामधील  रहिवाशी असलेल्या सौ. संगिता राजू राठोड यांनी गावातील दहा महिलांना एकत्र करत सदगुरु स्वयंसहाय्यता बचतगटाची स्थापना करुन त्या माध्यमातून विश्वजीत कुक्कुटपालन व ओवी अगरबत्ती व्यवसाय सुरु करुन त्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.  या व्यवसायातून स्वत:च्या कुटूंबाबरोबरच गावातील महिलांच्या जीवनात आर्थिक उन्नती करण्याबरोबरच समाजामध्ये एक मानाचे स्थान मिळवून देण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

उमेदच्या माध्यमातून बचतगटाची स्थापना करत सुरुवातीला प्रत्येक महिलेने दरमहा बचत केली.  चार वर्षे भांडवल जमा केल्यानंतर भांडवल तसेच बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन एखादा व्यवसाय सुरु करण्याचा निर्धार सर्व महिलांनी केला.  बँकेमार्फत कर्ज मिळवुन बारमाही चालणारा व्यवसायाच्या शोधात असताना कुक्कुट पालन हा पर्याय महिलांसमोर आला आणि मोठ्या नेटाने हा व्यवसाय सुरु केला.  दर दीड महिन्याला कोबड्यांची एक बॅच निघत असुन सर्व खर्च जाता एक ते दीड लक्ष रुपयांचे उत्पन्न यातून प्राप्त होऊ लागले.

केवळ एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता बचतगटाच्या माध्यमातून इतरही व्यवसाय करावा व त्यातून अधिक उत्पन्न घेण्याचा निर्धार या महिलांनी केला. बाजारपेठेमध्ये बाराही महिने मागणी असलेल्या अगरबत्तीचे उत्पादन करण्याचे ठरविले.  अगरबत्ती उत्पादनासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे होते. सुरत येथे खासगी कंपनीमध्ये अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री खरेदी करण्यात आली.  या गटाच्या माध्यमातुन तीन प्रकारच्या ब्रँडची निर्मिती करण्यात येत असुन दरदिवशी 40 ते ५० किलो अगरबत्ती तयार करण्यात येते . मालाचा दर्जा अत्यंत चांगल्या दर्जाचा असल्याने जालना जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभरात माल पोहोचविण्यात येतो.  

बचतगटामुळे आज आम्ही सर्वजणी आमच्या स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या असुन आमच्या संसारालाही मोठा हातभार लावत आहोत.  उमेदच्या सहकार्यामुळे आज आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेने स्वत:ला कमी न लेखता एकत्रित येऊन बचतगटाच्या माध्यमातुन संघटीत होत आपले कर्तृत्व सिद्ध करावे, अशी भावनाही श्रीमती संगिता राठोड यांनी यावेळी व्यक्त केली.

                                                                                              जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                               जालना.

 

 

 

 

No comments:

Post a Comment