Friday 3 June 2022

अनुकंपा तत्वावर दोन उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तलाठीपदाचे नियुक्तीपत्र

 




 

            जालना दि. 3 (जिमाका):-  सरळसेवा कोट्यातील रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के पदे ही अनुकंपा तत्वावर भरण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अनुकंपा तत्वावर दोन उमेदवारांना तलाठी या  पदावर आज दि. 3 जुन रोजी नियुक्तीपत्र देत प्रामाणिकपणे व सचोटीने काम करण्याची सुचना केली.

            सरळसेवा पद्धतीने रिक्त जागांवर भरती करत असताना शासन निर्णयाप्रमाणे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी प्रतिक्षा यादीमध्ये असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी सातत्याने आढावा घेत असतात.  तहसिल कार्यालय, भोकरदन येथे तलाठी या पदावर कार्यरत असलेले सुभाषसिंग सुखलाल राजपुत यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले होते.  त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा चेतन सुभाषसिंग राजपुत यांना  उप विभागीय अधिकारी कार्यालय, भोकरदन येथे तलाठी पदावर तर तहसिल कार्यालय, अंबड येथे कर्तव्यावर असताना निधन झालेले नवनाथ पुंडलिकराव गायकवाड यांचा मुलगा तुषार नवनाथ गायकवाड यांना उप विभागीय कार्यालय, अंबड येथे तलाठी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            समाजाची सेवा करण्याची संधी शासन नोकरीमध्ये मिळत असल्याने या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करत अत्यंत प्रामाणिक तसेच सचोटीने काम करण्याची सुचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिली.

            जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड या संवर्गातील सन 2021-22 या वर्षात पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली असुन तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात 10, महसुल सहाय्यक संवर्गातुन अव्वल कारकून 9, शिपाई संवर्गातुन महसुल सहाय्यक संवर्गात 2  कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबरोबरच सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या गट-क व गट-ड च्या 33 कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा लाभही देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment