Monday 13 June 2022

जालना जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा -- पालकमंत्री राजेश टोपे



            जालना दि. 13 (जिमाका) :- सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता पोलीसांनी  गुन्हेगारी प्रवृत्तींवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  राजेश टोपे यांनी दिले. जिल्हयात अतिरिक्त पोलीस स्थानकांच्या संख्या वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केला  जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज व्यापारी महासंघाच्या आयोजित बैठकीत  ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरटंयाल, जिल्हाधिकरी डॉ. विजय राठोड,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींसह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी व  अन्य व्यापारी उपस्थित होते.

            श्री. टोपे म्हणाले की, जालना शहर व जिल्हयात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडकपणे कारवाई करावी. विशेषत: औदयोगिक वसाहतीत अधिक लक्ष घालून उदयोजक, कामगार व नागरिकांना  कुठल्याही  प्रकाराचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.  मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.  शहर व ग्रामीण भागात पोलीस स्थानकांची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वीच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. राज्याचे गृहमंत्री, सचिव व पोलीस महासंचालक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करुन जालना जिल्हयातील सुरक्षा विषयक बाबी व पोलीस स्थानकांची संख्या वाढ याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल.

            बोगस प्रॉपर्टी कार्डधारकांविरोधात कडक कार्यवाईची  सूचना करताना  पालकमंत्री म्हणाले की,  बोगस प्रोपर्टी कार्डधारक हा गंभीर विषय असून  अशा कार्डधारकांविरोधात  जिल्हा  व पोलीस प्रशासनाने  तातडीने कारवाई करावी.  दबावतंत्राने अतिक्रमण करणाऱ्यांचीही अजिबात गय करु नये. कुठल्याही अवैध व्यवसायाला  थारा मिळता कामा नये. पोलीसांनी वेळीच  गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखवून  गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment