Wednesday 15 June 2022

शाळेचा पहिला दिवस : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 




           

            जालना दि. 15 (जिमाका) :- बदनापुर तालुक्यातील नजीक पांगरी येथील कै.नानासाहेब पाटील विद्यालयात शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पांडुरंग वाघ, शिक्षणाधिकारी (मा)  मंगल  धुपे, गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती राठोड, पी.एच. जनबंधू  श्री. कुमावत, श्री. गायकवाड,. डी. एन. क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, मानवी जीवनामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे.  शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद असुन  शिक्षणाच्या माध्यमातुन आपण आपल्याला हवे असेलेले स्वप्न पुर्ण करुन यशाची शिखरे पादाक्रांत करु शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने जिद्दीने, चिकाटीने व मन लावुन शिक्षण पूर्ण करुन विविध क्षेत्रामध्ये यश संपादन करत आपला नावलौकिक वाढवावा.

            मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील अनुभव सांगुन अनेक अडचणींवर मात करत शिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यामुळेच आज प्रशासनातील मोठ्या पदावर असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा समर्थपणे मुकाबला करुन शिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.     

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल व पाठ्यपुस्तकांचे तसेच क्रीडा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.  तसेच शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment