Sunday 5 June 2022

वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्ष लागवड करा ---- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 






जालना दि. 5 (जिमाका):- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन विभाग, जालना यांच्यावतीने वन उद्यान, जालना येथील सर्वे नंबर 204 व मौजे दरेगाव येथील गटनंबर 70 मधील घनदाट  वृक्ष लागवडीचा वृक्षारोपण करून  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  यावेळी वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी  अधिक प्रमाणात वृक्ष लागवड करा, असे  आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार, सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे, वनपरिक्षेत्र जालना उत्तर  अभिमन्यू खलसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना दक्षिण अभय अटकळ यांच्यासह सह वनपाल कैलास, पचलोरे,राठोड,गाडगीळ, अवचार, व वनरक्षक तेलंगरे, मानटे ,पाटील,आस्मा,अनिता भावले,दांडगे,मुटके, सोनू जाधव, कैलास राठोड, सोडगिर, शिनगारे ,नाईकवाडे, दाढे, वाकोदकर,,मुऱ्हाडे, गुसिंगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची  असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे जतन व संवर्धन  केले पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. एक झाड 50 टन ऑक्सिजन त्याच्या आयुष्यभरात निर्माण करते. झाडे जर पृथ्वीवर राहिली नाही, तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होण्यास कोणताही अवधी लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे जतन संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. जेणेकरून पर्यावरणाचे देखील संरक्षण होईल व इको सिस्टीम संतुलित राहण्यासाठी त्याची मदत होईल.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी वन उद्यान जालना येथील तसेच मौजे दरेगाव येथील  प्रथम वर्ष ,द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष घनदाट वृक्षलागवड रोपवन स्थळाची पाहणी केली व घनदाट रोपवनातील रोपांची उत्कृष्ठ वाढ व जिवंत रोपांची टक्केवारी पाहून सर्व वन अधिकारी व वन कर्मचारी यांचे कौतुक केले व दरेगाव येथील जंगलातील हरणाचे कळप पाहून आनंद व्यक्त केला.

             पर्यावरणाबाबत आपले दायित्व ओळखून प्रत्येक  व्यक्तीने किमान तीन झाडांची लागवड करावी तसेच त्याचे संवर्धन व संरक्षण करावे प्रत्येकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी म्हणून ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन व संरक्षणदेखील केले पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटवून देता येईल व येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल, असे आवाहन उपवनसंरक्षक औरंगाबाद सूर्यकांत मंकावार यांनी सर्व नागरिकांना केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या  कै.  वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाची पूर्व तयारी व शुभारंभ जिल्ह्यात या निमित्ताने  करण्यात आला. कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना जिल्ह्यास 82.56 लक्ष  एवढे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून सदर उद्दीष्ट वन व सामाजिक वनीकरण विभागासह जिह्यातील कृषी ,रेशीम, जिल्हा परिषद ,इ यंत्रणासह एकूण 47 यंत्रणांना वाटप करण्यात आलेले आहे. सदर लागवडीसाठी आवश्यक असलेली सर्व रोपे जिल्ह्यात उपलब्ध आहेत वन व सामाजिक वनीकरण विभागाकडे उत्कृष्ट अशी 14 लक्ष रोपे  उपवनसंरक्षक, औरंगाबाद  सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली असून यंदाच्या पावसाळ्यात वन व सामाजीक वाणीकरणासह  सर्व यंत्रना मिळून 82.56 लक्ष रोपांची जिल्ह्यात लागवड करण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वनविभागाची  लगबग सुरू झालेली आहे. जिल्ह्यामध्ये वन विभागामार्फत  करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या  अनुषंगाने खड्डे खोडण्याची  कामे  पूर्ण झालेली असून वन विभागाच्या रोपवाटिकेत उत्तम प्रतीची रोपे लागवडीसाठी तयार झालेली असून त्यांच्या  लागवडीसाठी वन विभाग सज्ज झालेला आहे जालना जिल्ह्यातील वन विभागाच्या उत्तर दक्षिण दोन्ही परिक्षेत्रामध्ये ही वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे  पुष्पा पवार सहाय्यक वनसंरक्षक यांनी यावेळी  सांगितले.

-*-*-*-*-*-         

 

No comments:

Post a Comment