Monday 13 June 2022

अत्याधुनिक अशा सर्वसाधारण व ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहासह शव चिकित्सागृहाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहांच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्या - पालकमंत्री राजेश टोपे

 






           जालना, दि.  13 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशा सर्वसाधारण व ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहाबरोबरच उभारण्यात आलेल्या शवचिकित्सागृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक व सर्व सुविधांनीयुक्त उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहाचा उपयोग सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी करावा अशी सूचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केली.

            याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ‍. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रताप गायकवाड, डॉ. संजय जगताप, डॉ. नितीन पवार, डॉ. प्रवीण मरकडे, डॉ राजू जाधव,         डॉ. अनिल पवार, डॉ. योगेश राठोड, डॉ. अभय गोंदीकर, डॉ. राहुल भालेराव, डॉ. नितीन शहा, डॉ. शेख आरीफ, डॉ. शेजुळे, डॉ. मूलगीर, डॉ. अर्पणा सोळुंके, डॉ. उमेश जाधव, डॉ. संतोष जायभाय आदींची उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य क्षेत्रात नवनवीत तंत्रज्ञान विकसित होत आहे.  या तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोग्याच्या सेवा अधिक बळकट करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येत आहे.  अत्याधुनिक अशा शस्त्रक्रियागृहांची उभारणी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात येणार असुन जालन्यापासुन याचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहामध्ये संसर्गबाधा होऊ नये याची परिपूर्ण काळजी घेत शस्त्रक्रियागृहाला स्टेनलेसस्टीलचे आवरण देण्यात आले असुन या ठिकाणी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, ऑक्सिजन आदी सुविधांबरोबरच तीन प्रकारचे फिल्टरही बसविण्यात आले आहेत.  ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहात अत्याधुनिक सीयाम मशिन्स, फ्रॅक्चर टेबल आदी अत्याधुनिक अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने सर्वसामान्यांना या ठिकाणी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

            शवचिकित्सागृहाचीही भव्य अशी इमारत उभारण्यात आली असुन या ठिकाणी दोन मोठे हॉल, बॉडीवॉश, व्हिसेरासाठी स्वतंत्र दालन, शवपेट्या ठेवण्यासाठी सुविधा यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.  शवचिकित्सेमध्ये तातडीने व्हिसेराचा अहवाल मिळण्याबरोबरच पोलीस यंत्रणेबरोबर समन्वय राहण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करुन त्याची अंमलबजावणीही लवकरच करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह परिचारिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment