Sunday 5 June 2022

जालन्याची कृषि उत्पन्न बाजार समिती राज्यातील इतर बाजार समितीसाठी आदर्शवत ठरली आहे -- उदयोग मंत्री सुभाष देसाई

 





 

जालना, दि. 5  (जिमाका)  :-  जालना येथील कृषी  उत्पन्न बाजार समिती   शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी  सातत्याने कार्यरत  असल्याने  राज्यातील इतर बाजार समितीसाठी  तिने एक आदर्श निर्माण केला आहे. हा दबदबा असाच कायम राहावा, अशी अपेक्षा राज्याचे  उदयोग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री  सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

जालना येथील   कृषि  उत्पन्न बाजार समितीच्या  आवारातील रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण, मार्केट यार्डास संरक्षण भिंत बांधणे आणि  सेंक्टर क्रमांक आठ मध्ये कॉक्रीट  रस्ते  व पायाभूत  सुविधांच्या कामांचे भूमिपूजन  श्री. देसाई यांच्या हस्ते  आज झाले. यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात  ते बोलत होते. भूमिपूजन कार्यक्रमास  महसुल राज्यमंत्री  अब्दुल सत्तार, कृषि  उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, कृषि  उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती  भास्कर दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, ए.जे. बोराडे, अभिमन्यु खोतकर,  आदी उपस्थित होते. मेळाव्यास मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

   शेतकऱ्यांच्या हितासाठी  राज्य शासन सदैव कटीबध्द आहे, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले की,  जालना येथील कृषि  उत्पन्न बाजार समिती  सातत्याने भरभराटीकडे  वाटचाल करताना दिसत आहे.  शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या  हितासाठी या समितीने  अनेक सुविधा उपलब्ध करुन  दिलेल्या आहेत.   राज्यातील क्रमांक एकचे शीतगृह म्हणून येथील शीतगृह ओळखले जाते.  याशिवाय  येथील रेशीम कोष खरेदी-विक्रीची  बाजारपेठही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.  विशेष म्हणजे  जालना जिल्हयात उत्पादित होणारे  रेशीमकोष अतिशय उच्च दर्जाचे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे  या कोषाला देशात  मोठी मागणी आहे.  रेशीमपासून सिल्क तयार होणारे केंद्रही  येथे वेगाने  स्थापित व्हावेत.  यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

श्री. देसाई पुढे म्हणाले की,  मा. मुख्यमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी  ‘विकेल  ते पिकेल’  या  संदेशालाही  शेतकऱ्यांचा  चांगला प्रतिसाद  मिळत आहे. औरंगाबाद  व जालना येथील शेतकरी  या संदेशानुसार बाजारात ज्या  पिकाला जास्त मागणी आहे, ती  पिके घेऊन आर्थिक दृष्टया सबल होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी   राज्य शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची अजिबात चिंता करु नये.  शेतमालाच्या खरेदीसाठी  राज्यशासन  शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल.  जालना जिल्हयात  स्टील व बि-बियाणांचा उदयोगही  अतिशय  भरभराटीचा  आहे. हा जिल्हा असाच विविध उदयोगांत  प्रगती करावा, अशी अपेक्षाही  श्री.  देसाई यांनी व्यक्त केली.

            महसुल राज्यमंत्री  अब्दुल सत्तार म्हणाले की,   शेतकऱ्यांच्या हितासाठी  उत्कृष्ट कार्य करणारी  जालना येथील कृषि  उत्पन्न बाजार समितीचा राज्यात  नावलौकिक आहे.  शेतमालाला चांगला भाव  देणाऱ्या   या समितीने शेतकऱ्यांसाठी  यापुढेही   उत्तम सुविधा देत राहाव्यात.

            कृषि  उत्पन्न बाजार समितीचे सभापती  अर्जुन खोतकर म्हणाले की,  मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा  प्रयत्न जालना येथील कृषि  उत्पन्न बाजार समिती  करत आली आहे. येथील व्यापारी, हमाल-मापाडी, कष्टकरी महिलांनाही  समिती  सहकार्य करत आली आहे.  येथील रेशीम कोष खरेदी-विक्रीचे केंद्र राज्यात अग्रक्रमांकावर आहे.  येथे रेशीम कोषाला चांगला भाव दिला जातो.  मागील वर्षी येथे  नऊशे कोटींचा व्यवहार झाला.  परराज्यातील अनेक व्यापारी येथे रेशीम कोष खरेदीसाठी येतात.  यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी ही कृषि  उत्पन्न बाजार समिती  सातत्याने कार्यरत राहिल.

           

-*-*-*-*-*-

 

 

 

 

No comments:

Post a Comment