Sunday 5 June 2022

श्रमदानासाठी जालनेकर पहाटेच कुंडलिका-सीना नदीपात्रात पर्यावरण तज्ञ पाशा पटेल यांची विशेष उपस्थिती

 



जालना दि. 5(जिमाका) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पहाटे साडे सहा वाजता  जालनेकरांनी  कुंडलिका -सीना नदीच्या पात्रात श्रमदान करुन वृक्षरोपण केले.   जालना समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका -सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशनच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाला जालनेकरांनी भरभरुन दाद दिली.

पर्यावरण तज्ञ तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.  त्यांनी  नदीपात्राची करण्यात येत असलेली स्वच्छता आणि वृक्षरोपणाचे  कौतुक करीत जालनाकरांना या अनोख्या उपक्रमाबददल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी  बांबू लागवडीचे महत्त्वही  समाजावून सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, समस्त महाजन ट्रस्टच्या महराष्ट्र प्रभारी नूतन देसाई, सूनील रायठठ्ठा, अक्षय शिंदे, डॉ. सुयोग कुलकर्णी, प्रतिभा श्रीपत, अनया अग्रवाल, यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विनोद जैतमहाल हे त्यांच्या सहका-यांसह गेल्या महिनाभरापासून विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि श्रमदानासाठी जालनेकरांमध्ये जनजागृती करीत आहेत. 

आज जागतिक पर्यावरण दिन, या दिनाचे महत्त्व ओळखून मागील दोन महिन्यांपासून समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका –सीना पुनरुज्जीवन फाउंडेशन परिश्रम घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जालना शहरातून वाहणाऱ्या या नदी पात्राची स्वच्छता करुन गाळही काढण्यात आला. पर्यावरण  दिनाच्या निमित्ताने आज नदीपात्रामध्ये स्वच्छता करुन काठावर जालनेकरांनी  वृक्षारोपण केले. यासाठी जालना शहरातील व्यापारी, अधिकारी यांच्यासह  मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते.

***

No comments:

Post a Comment