Friday 3 June 2022

अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



            जालना, दि. 3 (जिमाका) --- विविध शासकीय विभागांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

             अनुकंपा नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी बैठकीस उपस्थित होते.

            विविध विभागात गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा नियुक्तीची अनेक प्रकरणे प्रदिर्घ काळापासून  प्रलंबित राहत असल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची कार्यवाही जलदगतीने  पूर्ण करणे  व त्यानुसार सरळ सेवेच्या कोटयातील  रिक्त पदांच्या २० टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने  विभागप्रमुखांनी कोणती कार्यवाही केली व चालू वर्षात अनुकंपा नियुक्तीने किती पदे भरली आहेत.  याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी  घेतला.  त्याचबरोबर  मागील सन 2019-20, 2020-21 व 2021-22  या वर्षात किती पदे रिक्त झाली व  अनुकंपा तत्त्वावर किती पदे भरण्यात आली आहेत, याचाही आढावा घेतला.

             अनुकंपा नियुक्तीबाबत निर्देश देताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, अनुकंपा उमेदवारांचे नाव आपल्या कार्यालयाच्या  प्रतीक्षा सूचीवर  समाविष्ट केल्यास, त्याच तारखेस  विलंब न करता  सदर परिपूर्ण प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या, दि. २१ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन  निर्णयामध्ये  नमूद केल्याप्रमाणे  आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव  जिल्हास्तरीय सामायिक यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. तसेच सामायिक यादीतील  समाविष्ट असलेल्या अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती दिल्यास  संबधितांचे नाव  सामायिक यादीतून वगळण्यासाठी  पत्राव्दारे तातडीने कळवावे. अनुकंपा  त्रैमासिक  अहवालाकरीता  प्रतिवर्षी  माहे मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर  अखेर माहिती , अनुकंपा तत्त्वावर  दिलेल्या नियुक्तीबाबतचे आदेश  व उपलब्ध पदे  याबाबतची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनाविलंब सादर करावी. तसेच वेळोवेळी  मागणी करण्यात आलेली  अनुकंपा नियुक्तीबाबतची अदयावत माहिती  तात्काळ सादर करण्याची  दक्षता सर्व विभागप्रमुखांनी  घ्यावी.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment