Monday 24 August 2020

मूग व कापूस या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करा उद्दिष्टापेक्षा कमी पीककर्ज वाटप करणाऱ्या बँकेतील व्यवस्थापकांवर कारवाई करा जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या.

 


    जालना दि. 24 (जिमाका) - जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मूग व कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी  निवृत्ती गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, कल्याण सपाटे, महादेव घेंबड, विष्णुपंत गायकवाड, सतीश होंडे आदींची उपस्थिती होती.    

      उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे मूग पिकाबरोबरच कापूस पिकामध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम मिळावी यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देत यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री तसेच सचिवांशी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तातडीने देण्यासंदर्भात चर्चासुद्धा करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी मूग व कापूस या पिकांचा विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना  विम्याची रक्कमही तातडीने मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

      जालना जिल्ह्यामध्ये ऊसावर पडलेल्या पांढरी माशी तसेच मावा या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनाही या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी त्याचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्याचबरोबर नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

    शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात 61 टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.अद्यापही 39 टक्के पीक कर्जाचे वाटप करणे बाकी आहे.जिल्ह्यात असलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक या दोन बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यंत कमी प्रमाणात कर्जाचे वाटप केल्याचे  निदर्शनास आले आहे जालना जिल्ह्यात एसबीआयच्या 20 व युनियन बँकांच्या चार शाखा आहेत.

      ज्या शाखांनी उद्दिष्टपेक्षा कमी कर्जवाटप केले आहे. अशा शाखेतील व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे निर्देश देत जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.    

       महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 666 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली असून  1 लाख 58 हजार 455 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच त्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगत 2 लाख रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या शेतक-यांच्या तसेच वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने बँकेला सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचे मुबलक प्रमाणात वाटप व्हावे यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment