Saturday 8 August 2020

कोरोनाच्या महामारीमध्ये स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच जनतेची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्या -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

 





 

            जालना दि. 8 (जिमाका)महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. प्रत्येक काम करण्यात महसूल विभाग नेहमीच अग्रेसर आहे.  कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्येसुद्धा महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्यांमध्ये जाऊन जनतेची सेवा करत आहेत. हे करत असताना प्रत्येकाने आपल्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन जनतेच्या सेवेमध्ये कुठे खंड पडणार नाही अथवा जनतेची कामे खोळंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन   जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

            महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा,जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर,  उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे,  उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, तहसिलदार संतोष बनकर, तहसिलदार प्रशांत पडघन, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, नायब तहसिलदार श्रीमती  मयुरा पेरे, महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळेआदींची उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले लोककल्याणासाठी शासनाचे सर्व विभाग काम करत असतात.जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या नोंदीपर्यंत सर्वसामान्यांचा महसूल विभागाशी संपर्क येत असल्यामुळे या विभागाचे महत्त्व वेगळेच आहे.गत दोन वर्षांमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका, टंचाई परिस्थिती यासारकाही कामे करत असताना सुद्धा महसूल विभागाचे काम अविरतपणे सुरू आहे. शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांचा सातत्याने संपर्क येणारे विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. कोरोना महामारीच्या काळामध्ये आरोग्याच्या सेवा देण्याचे काम आरोग्य विभागाचे असले तरी कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच  नियंत्रण करण्याचे काम महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन जनसेवेच्या व्रतामध्ये कुठेही खंड पडणार नाही,याची दक्षता घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.

 

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड  म्हणाले की, जन्मापासुन ते मृत्यूपर्यंतच्या नोंदी, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यामध्ये महसुल विभाग अग्रेसर आहे.  महसुल विभागामध्ये काम करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतू या विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना समाजामध्ये मानही तेवढाच मोठा मिळतो.  त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करत असताना नकारात्मक भावना बाळगता सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे.  प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांच्यावर येणारा तणावर कमी होऊन आपल्या परिवारालादेखील पुरेसा वेळ देता येईल. 

 

            यावेळी महसुल प्रशासनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे , तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार श्रीमती स्नेहा शंकरराव कुहिरे, श्रीमती  अंजली कुलकर्णी,  शदर आडणे, दि. रे. कुरुंदकर,व्हि. एस. लोखंडे, ए.व्ही. कड, शेख युसुफ अ. सत्तार, वामन सौभागे, शाम विभुते तसेच दहावी बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या महसुल प्रशसनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे संचलन श्रीमती माधुरी मोरे यांनी केले तर आभार नायब तहसिलदार श्रीमती स्नेहा कुहिरे, यांनी मानले.  कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment