Monday 31 August 2020

माई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र व गरजु लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ द्या योजनेचा लाभ देण्यात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार घरकुलाची प्रलंबित असलेली कामे जलदगतीने पुर्ण करा - पालकमंत्री राजेश टोपे

 

            




            जालना, दि. 31:- रमाई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र व गरजु लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ देण्यात यावा. या बाबतीत अधिकाऱ्यांची कुठलीही सबब ऐकुन घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देत मागील वर्षातील प्रलंबित असलेली कामे जलदगतीने पुर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            रमाई आवास योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, श्रीमती नंदनवन यांच्यासह सर्व तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, रमाई घरकुल योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यास दरवर्षी घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात येते. परंतु मागील दोन ते तीन वर्षातील उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण झाले नसल्याने नाराजी व्यक्त करत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण झालेच पाहिजे. घरकुलाची करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            सन 2016-17, 2018-19 या वर्षामध्ये प्रलंबित असलेल्या घरकुलाची कामे जलदगतीने पुर्ण करण्यात यावीत. या घरकुलाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता भासत असल्यास आपण व्यक्तीश: मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत या योजनेसंदर्भात दर आठवड्याला आढावा घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

            समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात.  परंतु त्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.  कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणुक द्या.  केवळ शासकीय कामकाज म्हणुन काम न करता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करण्याची गरज असुन या योजनेपासुन एकही पात्र व गरजु लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

            जायकवाडी धरण 90 टक्के भरले असुन या धरणात अधिकच्या पाण्याची आवक झाल्यास धरणातुन केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.  त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात यावा.  आपत्तीच्या अनुषंगाने उपलब्ध साहित्याची तपासणी करुन घेण्याबरोबरच पुर परस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी निवारा, पाणी, भोजन या सर्व सोई-सुविधांचे नियोजन आत्ताच करुन ठेवण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  *******

No comments:

Post a Comment