Saturday 15 August 2020

कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - पालकमंत्री राजेश टोपे

 





 

जालना दि.15- (जिमाका)- कोरोना विषाणूने जगासमोर एक मोठे संकट उभे केले आहे. जालना जिल्ह्यात या कोरोना विषाणूचा  मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्याच्या सर्व सुविधा, उपचारासाठी डॉक्टर्स तसेच पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून समाजातील कोणताही गरीब व्यक्ती औषधोपचाराचा पासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण काळजी शासन व प्रशासन घेत आहे.

कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी जनतेला उद्देशून संदेश देताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार संतोष सांबरे,जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अघीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा आरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी जालना संदीपान सानप,जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसयै, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले यांची उपस्थिती होती.

श्री टोपे म्हणाले, सध्या आपण कोरोनासारख्या घातक संकटाचा धैर्याने सामना करीत आहोत. आपल्या जालना जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज व स्वतंत्र अशा कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी 120 खाटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी 40 खाटाची आय सी यु ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे 200 खाटांचे ऑक्सिजन सपोर्टेड कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. याच रुग्णालयामध्ये  40 खाटांचे आय.सी.यु. निर्माण करण्याचे काम  लवकरच पूर्ण होणार आहे. गरज भासल्यास आणखी 20 खाटा वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे.

राज्यासह जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होऊ नये यावर शासन व प्रशासनामार्फत लक्ष केंद्रित करण्यात येत असून ट्रेसिंग व ट्रेकिंगवर  भर देण्यात येत आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या   व्यक्तींचे अलगीकरण करण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. अलगिकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना पौष्टीक असा आहारही देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी ऑक्सीजन सुविधा थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे.

 जिल्ह्यातील खासगी दवाखान्याचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांनी उपचारापोटी एकही रुपया न भरण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.

 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकलेला कापूस लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात विक्रीवाचून पडून होता. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापूस विक्री व्हावा यासाठी शासन व प्रशासनाने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाची विक्रमी खरेदी केली. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळामध्ये गोरगरीब व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात अन्नधान्याचे वाटप करण्याबरोबरच शिवभजन योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांच्या पोटाची खळगी भरण्याची काम शासनामार्फत करण्यात आले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, बांधावर खत, कर्जमाफी या  योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही  मदत करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिल्या.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे.  याचा अंगीकार दैनंदिन जीवनात सर्वांनी केल्यास कोरोनावर आपण निश्चितपणे मात करु शकू असा विश्वासही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोविड रुग्णालयातील उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी,कर्मचारी तसेच कोविड विषाणुचे अतिगंभीर अवस्थेतेतुन बरे झालेले रुग्णांचा  पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन  गौरविण्यात  आले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन निशिकांत मिरकले,  दिपक दहेकर यांनी केले.

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment