Thursday 20 August 2020

जालना शहरातील 107 वर्षीय वृध्द महिलेने केली कोरोनावर मात

 



 जालना दि. 20 (जिमाका) :- जालना   येथील कोविड रुग्णालयात  शहरातील माळीपुरा येथील रहिवाशी  असलेल्या 107 वर्षीय महिलेसह तिच्या कुटुंबातील मुलगी ,मुलगा, नात आणि पणतु  यांनी इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर मात केली असून त्यांना आज कोविड रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

   जालना येथील कोविड रुग्णालयात दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आल्याने  जालना शहरातील माळीपुरा भागातील 107 वर्षीय वृध्द महिला  या महिलेची 78 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय मुलगा, 27 वर्षाची  नात व 17 वर्षीय  पणतु यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस यांनी केलेल्या अथक परिश्रमातुन 107 वर्षीय वयोवृध्द आजीसह त्यांच्या कुटुंबातील मुलगी,मुलगा, नात व पणतु हे कोरोनामुक्त झाले आहे. कोरानावर मात करणा-या या आजीचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी प्रत्यक्ष भेट घेवुन संपुर्ण परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की. कोरोनाचे योग्य निदान व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्‍य असून त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जालना शहरातील रहिवासी असलेल्या 107 वर्षे वयाच्या आजी आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून जालना शहरातील आजी कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्या असून  नागरिकांनी कोरोनाबद्दल मनात कुठलीही भीती न बाळगता उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी  केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संजय जगताप, डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रताप घोडके, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय आदींची उपस्थिती होती.

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment