Thursday 20 August 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात कमीत कमी मंडळांनी अत्यंत साधेपणाने व सामाजिक अंतराचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी रविंद बिनवडे यांचे आवाहन

 



     जालना दि 20-  गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात कमीत कमी मंडळांनी अत्यंत साधेपणाने व सामाजिक अंतराचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.

     गणेशोत्सवाच्या व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, तसेच जिल्ह्यातील सर्व शांतता समिती सर्व पदाधिकारी  गणेश मंडळांचे प्रमुख   आदींची  उपस्थिती होती

       जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले जिल्ह्यामध्ये गणेश मंडळांनी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी नगरपालिका प्रशासनाकडून परवानगी घेणे  आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी मंडळांना गणेशोत्सव परवानगी देण्यात येणार नाही.

गणेशोत्सवात सकाळच्या व संध्याकाळच्या आरतीसाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक अंतराची पालन करणे, सॅनिटायझर, मास्क आदींचा वापर करणे गणेश मंडळांना बंधनकारक असणार आहे. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनामार्फत

कृत्रिम तलाव तसेच वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असून गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी नगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. कोरोना विषाणूचा  नायनाट करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सूचनांचे  तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केले.

     यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्य म्हणाले, सणाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामार्फत जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कुठेही गर्दी होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करत गर्दी टाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  हे वरील प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

     महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा (कोविड -19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

  महाराष्ट्र शासनाने कोरानेा विषाणुने (कोविड -19) उद्भभवणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोविड 19, उपाययोजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे व त्याला कार्यक्षेत्रातील कोविड नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील असे जाहीर केले आहे.

    या कार्यालयाचे समक्रमांकित आदेश दि.30 जुलै 2020 जालना जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे.

    वरील संदर्भ क्र. 4 अन्वये महाराष्ट्र शासनामार्फत कोविड -19 उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

   जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुचा (कोविड -19) वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जालना जिल्ह्यात गणेशोत्सव 2020 हा सण अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करुन साजरा करणे आवश्यक आहे.

    रवींद्र बिनवडे जिल्हादंडाधिकारी जालना फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार मला प्राप्त असलेल्या अधिकारानवये दि.21 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपासुन ते  दि. 2 सप्टेंबर 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत संपुर्ण जालना जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागु करीत आहे. तसेच गणेशोत्सवासाठी वरील संदर्भ 4 अनवये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्य अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेशीत करीत आहे.

   सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, जालना यांचेकडे नोंदणीकृत गणेश मंडळांनाच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाची व स्थानिक स्वराज्य संस्था, परवानगी देणा-या संबंधीत शासकीय यंत्रणा यांची  यशोचित पूर्व परवानगी घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करात येईल.

   कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायलयाने निर्गमित केलेले आदेश तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादीत स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे.

  यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजीत करण्यास सक्त मनाई आहे.

    श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

  यावर्षी शक्यतो पारंपारीक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडुची, पर्यावरण पुरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नागरीकांनी श्रीच्या विसर्जनाकरीता पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरातच करुन मुर्ती स्थानिक स्वराज्य संस्थेकडुन नेमण्यात आलेल्या वाहनातच विर्सजनासाठी मुर्ती सुपुर्द करणे बंधनकारक राहील. मुर्तीचे विर्सजन स्थानिक नगर परिषद, नगर पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेकडुन यशोचितरित्या करण्यात येईल. सार्वजनीक गणेश मंडळ यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेकडुन नेमण्यात आलेल्या वाहनातच विर्सजनासाठी मुर्ती सुपुर्द करणे बंधनकारक राहील.

   उत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागणेस मनाई असेल. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक आदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

   सांस्कृतिक, गर्दीचे कार्यक्रमांऐवजी फिजीकल डिस्टंसिंगचे करुन आरोग्य विषयक उपक्रक, शिबीरे उदा. रक्तदान आयोजीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यु इ.  आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

    आरती, भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम  आयोजीत करतांना गर्दी नाही. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे, आरती, भजन व अन्य धार्मिक कार्यक्रमांना 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

   श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन , केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

    गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचा (फिजिकल डिस्टंसींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

   श्रीच्या आगमन व विर्सजन मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. श्रीच्या आगमन कार्यक्रमास 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच फिजिकल डिस्टंसींगचे पालन करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक गणेश मंडळै व संपूर्ण गल्ली, अर्पाटमेंट, चाळ,इमारतीतील सर्व गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणुक स्वतंत्रपणे, एकत्रीतरित्या काढण्यास सक्त मनाई येत आहे.

   नगरपालिका, नगरपंचायत, विविध मंडळे, गुहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

   वरील कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.

    कोविड -19 अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

   कन्टेंमेंट झोन मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेस सक्त मनाई आहे. कन्टेंमेंट झोन मधील व्यक्तींना कन्टेंमेंट झोन बाहेरील गणेशोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच जालना जिल्‌ह्यातील कन्टेंमेंट झोन मध्ये ये- जा करण्यास सक्त मनाई आहे. तसेच कन्टेंमेंट झोन बाबत सर्व संबंधीत उपविभागीय अधिकारी  तथा इन्सीडेंट कमांडर यांचे आदेश लागु राहतील.

    गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतु ॲप वापरणे बंधनकारक आहे. तसेच या कालावधीत गणपती मंडळांनी त्यांचे मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल नंबर, पत्ता, आरोग्य सेतु ॲप इत्यादी बाबत नोंद स्वतंत्र नोंदवहीत भेटी दिलेल्या ठिकाण, कार्यालय, व्यक्ती यांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. जेणेकरुन यदाकदाचीत संशयीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग  करणे सोयीचे होईल. तसेच गणेशोत्सवानंतर सदर नोंदवही जतन करुन ठेवावी व प्रशासनास आवश्यक त्यावेळेस सादर करावी.

      मिरवणुक,अन्नदान, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांतून होणा-या गर्दीला टाळण्याकरीता सदर बाबींना पुर्णत: मनाई करण्यात येत आहे.

  या कालावधीमध्ये गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद, इत्यादी नव्याने दुकाने लावण्यास मनाई असेल.

  स्थानिक नगर परिषद, नगर पंचायत,स्थानिक स्वराज्य संस्था यांनी श्रींच्या मुर्तींचे संकलन प्रभाग निहाय करणे संदर्भात योग्य ते नियोजन करावे व नागरिकांकडून व सार्वजनिक गणेश मंडळांकडुन मुर्ती स्वीकृत करुन यशोचित विसर्जन करावे.

   स्थानिक नगर परिषद, नगर पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विसर्जन स्थळी योग्य ते पोलीस बंदोबस्त व अग्निशमन  यंत्रणा बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, इत्यादी आवश्यक साहित्यासह उपस्थित ठेवावे.

   नागरिकांनी विसर्जनासाठी विसर्जनस्थळी जाण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. विसर्जनस्थळी  नगर परिषदेचे संबंधीत कर्मचारी यांनी फिजकल डिस्टंसींगचे पालन करणे बंधनकारक राहील.

  कोविड -19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन, यांनी विहीत केलेल्या नियमांचे सुध्दा अनुपालन करणे बंधनकारक आहे.

    प्रत्यक्ष उत्सव, सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन, प्रशासनाकडून काही अतिरिक्त सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे गणेश मंडळांवर बंधनकारक राहील.

  या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधीत यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाई पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी.असे  रवींद्र बिनवडे जिल्हादंडाधिकारी  व अध्यक्ष जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण  जालना यांनी कळविले आहे.

- *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment