Saturday 1 August 2020

कोरोना या महामारीच्या काळात कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाईसाठी तयार रहावे लिक्विड ऑक्सिजन प्लॅंटची उभारणी गतीने करा सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जेदार व गुणवत्तापुर्ण कामे करावीत जिल्हा कारागृहातील प्रत्येक बंद्यांची अँटीजेन तपासणी करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




                जालना दि. 1 (जिमाका) :- कोरोना या महामारीच्या काळामध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमुन दिल्या आहेत.  दिलेल्या जबाबदाऱ्या समजुन घेत मर्यादित काम न करता नाविन्यपुर्ण संकल्पना व कल्पकतेने काम करावे.  काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असुन काम न करणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाईसाठी तयार रहावे, असा सज्जड ईशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिला.
            कोरोनाच्या अनुषंगाने आज दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा नियोजन अधिकारी अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चांडक, उप अभियंता श्री नागरे आदींची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचे अलगीकरण करण्यासाठी कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.  या सेंटरच्या माध्यमातुन नागरिकांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबरोबरच दैनंदिन स्वच्छता ही झालीच पाहिजे.  या कामामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही.  या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही, याची सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक कोव्हीड सेंटरला त्या त्या उपविभागातील  उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी दैनंदिन भेट देऊन त्या ठिकाणी नागरिकांना देण्यात येत असलेल्या सुविधांची पहाणी करावी. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे जागेवरच निरसन करावे.  या कामात कुठेही हयगय अथवा दिरंगाई आढळल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्या कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.

लिक्विड ऑक्सिजन प्लॅंटची उभारणी गतीने करा
            कोरोनाच्या अनुषंगाने रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनामार्फत मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत असुन जालना येथे सर्व सुविधांनीयुक्त अशा कोव्हीड रुग्णालयाची उभारणी करण्याबरोबरच जिल्हा रुग्णालयाचेही रुपांतर कोव्हीड हॉस्पीटलमध्ये करण्यात आले आहे.  या कोव्हीड रुग्णालयातुन उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकता भासल्यास मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यादृष्टीने पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नातुन सीएसआरच्या माध्यमातुन 50 लक्ष रुपयांच्या माध्यमातुन लिक्विड ऑक्सिजन प्लॅट उभारण्यात येत आहे.  या ऑक्सिजन प्लँटचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे.  हे काम गुणवत्तापुर्ण व दर्जेदार अशा पद्धतीने व गतीने पुर्ण करण्यात यावे.  त्याचबरोबर ऑक्सिजन टँक रिफील करण्यासाठी 30 टन क्षमता असलेला टँकर या रस्त्यावरुन जाणार असल्याने रस्त्याचे कामही दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्यात यावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जेदार गुणवत्तापुर्ण कामे करावीत
कामात दिरंगाई केल्यास कारवाईसाठी तयार रहा
            शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये डॉक्टरांच्या निवासासाठी टाईप-1 व टाईप-2 अशा दोन ईमारती असुन प्रत्येक बिल्डिंगमध्ये 12 फ्लॅट आहेत. या ईमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.  रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात डॉक्टरांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.  डॉक्टरांच्या निवासस्थानाच्या किमान एका ईमारतीच्या दुरुस्तीचे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुर्ण होईल, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी.  कामात दिरंगाई झाल्यास कारवाईसाठी तयार रहा, असा ईशारा देत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये नव्याने अतिदक्षता तसेच शस्त्रक्रियागृहाच्या उभारणीचे काम तसेच पोस्टमार्टम कक्षाचे काम गतीने करण्याबरोबरच अंबड येथील रुग्णालयाचे सक्षमीकरणांतर्गत रुग्णालय व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती, घनसावंगी येथील दवाखान्याची मुख्य इमारत व निवासस्थानाच्या दुरुस्तीचे कामही गतीने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
            सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण झाली पाहिजेत. या कामांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगत रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी बीओटी तत्वावर सार्वजनिक शौचालयांची उभारणी, प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा शौचालयांची उभारणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
जिल्हा कारागृहातील प्रत्येक बंद्यांची अँटीजेन तपासणी करा
              जालना येथील कारागृहामध्ये जुन्या तसेच नव्याने येणाऱ्या प्रत्येक बंद्यांबरोबरच तेथे नियुक्त प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याची अँटीजेन चाचणी करण्यात यावी.  कारागृहासाठी स्वतंत्र अशा डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी.  चाचणीमध्ये पॉझिटीव्ह आढळलेल्या बंद्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येऊन त्या ठिकाणी जेल प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनानेही कडक असा पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
            दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस महसुल दिन म्हणुन साजरा केला जातो. महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा समजल्या जातो.  जे काम कुठलाही विभाग करु शकत नाही ते काम महसुल विभागामार्फत करण्याबरोबरच शासनाला आवश्यक असलेला महसुल जमा करुन देण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते. यावर्षीचे गौणखनिजाचे देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. महसुल विभागातील एकही काम प्रलंबित राहणार नाही याचेही नियोजन करण्याबरोबरच शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वितरण व्हावे यादृष्टीने बँकांकडे पाठपुरावा करण्याबरोबरच यावर्षी पाऊस चांगला असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सुचना देत उपस्थित अधिकाऱ्यांना महसुल दिनाच्या जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी शुभेच्छाही दिल्या.
8 ऑगस्ट रोजी महसुल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
            महसुल दिनाच्या अनुषंगाने दि. 8 ऑगस्ट, 2020 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड यांनी दिली.  यामध्ये महसुल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने अँटीजेन चाचण्या करण्यात येणार  असुन रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्राविण्य मिळवले आहे अशांचा गौरव करण्याबरोबरच गतवर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी श्री गायकवाड यांनी दिली.
एम्प्लॉई ऑफ वीक उपक्रमांतर्गत
दुसऱ्या आठवड्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव
            कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ वीक उपक्रमांतर्गत  दुसऱ्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या हस्ते  रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
            यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर आकाश आटोळे यांना चार हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट परिचारिका म्हणुन अनुजा दाणी यांना तीन हजार रुपयांचा धनादेश, उत्कृष्ट इलेक्ट्रीशियन सुधाकर वाहुळे यांना दोन हजार रुपयांचा तर रेणुका सिरसुन्ना, कक्ष सेवक यांना एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप यांनी दिली.
तर माझे चार धनादेश तयार
            कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देणे सर्वांचे कर्तव्य असल्याने या उपक्रमासाठी शासनाच्या कुठल्याही निधीचा वापर न करता स्वयंस्फुर्तीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी  होऊन कोव्हीड योद्धयांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.  परंतु ज्याही वेळेस बक्षिसांची रक्कम देण्यासाठी पैशांची कमतरता भासेल त्यावेळेस या कोव्हीड योद्धयांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाइी माझे चार धनादेश तयार असतील अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले.
*******

No comments:

Post a Comment