Tuesday 26 July 2022

"घरोघरी तिरंगा" उपक्रमात जालना जिल्हावासियांनो सहभागी व्हा ! -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन

 


            जालना, दि. 26 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरावर तसेच प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवून या महोत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त "घरोघरी तिरंगा" या उपक्रमाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)              श्रीमती शर्मिला भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय इंगळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. खांडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            शासनाच्या नियमानुसार तिरंगा झेंड्याचा आकार आयातकार असावा,  तिरंगा झेंड्याची लांबी:रुंदी प्रमाण हे 3:2 असे असावे, तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापड यापासून बनविल्या जाऊ शकतो.  झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा तिरंगा बनविला जातो.  मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असते. जिल्ह्यात ध्वज फडकविण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनानुसार पुरेशा प्रमाणात ध्वज उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांना योग्य किंमतीमध्ये ध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.   शासनाच्या आदेशानुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व कार्यालयांनी नियमानुसार संध्याकाळी ध्वज उतरवावा.  सर्वांनी तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे. तिरंगा फडकवताना केशरी रंग वरच्या बाजुने असावा. अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने झेंडा सन्मानाने व सुरक्षित ठेवावा. झेंडा कोठेही फेकला जाऊ नये. झेंडा सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करावी. "घरोघरी तिरंगा" याबाबत सर्व माध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात यावी.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment