Monday 4 July 2022

लेख:- डेंग्यु आजार लक्षणे, रोग नियंत्रण व उपाययोजना

 



   पावसाळयामध्ये डेंग्यू, मलेरीया, चिकनगुनिया,  हत्तीरोग यासारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण होत असते. शहरी भागात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी या रोगाचे प्रमाण व प्रसार अधिक प्रमाणात होतो. हा आजारापासुन वाचण्यासाठी योग्य ती काळजी व दक्षता घेतल्यास निश्चितच या आजारापासून संरक्षण मिळवता येते.  चला तर मग जाणून घेऊयात डेंग्यू आजार लक्षणे, रोग नियंत्रण व उपाययोजनेबाबत. …

            डेंग्यु ताप हा विषाणुजन्य रोग असुन प्रसार हा दुषित एडीस इजिप्ती नावाची मादी डास चावल्यामुळे होतो.  दुषित मादी ही मुत्युहोईपर्यंत दुषित राहुन निरोगी व्यक्तींना चावुन आजाराचा प्रसार करत राहते. रोगाचे प्रसारक डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यांत उदा. रांजण, माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तु, नारळाच्या करवंटया, टायर, इ. मध्ये पैदा होतात. जीवनचक्रामध्ये अंडी, अळी, कोष व पुर्ण डास असे जीवनचक्र पुर्ण करतात. हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात म्हणुन या डासांना टायगर मॉस्क्युटोसुध्दा म्हणतात.  दुषित डास हा निरोगी व्यक्तीस चावल्यास डेंग्यु ताप हा एकाएकी तीव्रपणे येतो व तीव्र स्वरुपाची डोके दुखी येते. तसेच स्नायुदुखी, सांधेदुखी व उलटया होतात. दुसऱ्या दिवसापासुन तीव्र प्रमाणात डोळे दुखू लागतात. अशक्तपणा येवुन भुक मंदावते व अंगावर पुरळ येतात. तसेच रक्तस्त्रावयुक्तः डेंग्यु तापमध्ये वरील लक्षणे दिसुन येतात. त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे आदी लक्षणे दिसुन येतात.  हा आजार हा बहुतांशी 15 वर्षाखालील मुलांना होतो. डेंग्यु ताप मध्ये जेव्हा रुग्ण बेशुध्द होतो त्याला डेंग्युशॉक सिंड्रोम असे म्हणतात.  यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते. एखादया व्यक्तीस वरील लक्षणे आढळुन आल्यास आरोग्य यंत्रणेमार्फत त्या व्यक्तीचा रक्तजल नमुना घेवुन डेंग्युरोग निदानाकरिता तपासणीस पाठविला जातो.  व्यक्ती दुषित आढळुन आल्यास रोगाचा प्रसार होऊ नये म्हणुन प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबिवल्या जातात.

पावसाळा सुरु झाला असल्यामुळे रोग प्रसार होवु नये यासाठी डासोत्पती स्थाने नष्ट करणे जसे पावसाळयात साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, इत्यादी. तसेच आठवडयातुन एकदा पाणीसाठे रिकामे करून कोरडा दिवस पाळण्यात यावा. साचलेली डबके व नाल्या वाहत्या कराव्यात. खड्डे बुजाविण्यात यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवडयातुन एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे. झोपताना अगंभर कपडे घालून झोपावे व मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक कॉइल, क्रीमचा वापर करण्यात यावा. डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्यात यावेत. हे मासे डासांच्या अळया नष्ट करतात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात. घरातील सांडापाणी साठे रिकामे करणे शक्य नसल्यास त्यांचे आरोग्य यंत्रणेमार्फत अॅबेटीग करून घेण्यात यावे.

 

                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय,

                                                               जालना.

 

No comments:

Post a Comment