Thursday 7 July 2022

अतिसारावर करु मात, ओआरएस आणि झिंकची घेऊ साथ अतिसार नियंत्रण पंधरवडा 1 जुलै ते १५ जुलै

 



    अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जालना जिल्ह्यात १ जुलै ते १५ जुलै २०२२ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये अतिसार संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत  विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  अतिसारामध्ये ओ.आर.एस.चे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचार पद्धती असून अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या उपायोजनांची माहिती प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे. …

अतिसाराची लक्षणे

            अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटा घटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पुर्ववत होणे, सुस्तावलेला किंवा बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.

पालकांनी घ्यावयाची काळजी

             जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा ए.एन.एम यांच्याशी संपर्क साधावा.

            मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची तसेच ते सुरक्षित व झाकण असलेल्या भांड्यात साठवले असल्याची खात्री करा. बालकाच्या आजूबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा. नेहमी शौचालयाचा वापर करा आणि उघड्यावर शौच करु नका. बालकाच्या शौचाची विल्हेवाट सुरक्षितरित्या लावण्याची सवय ठेवा.

            बालकाला अतिसार झाल्याबरोबर तसेच प्रत्येकवेळी शौच झाल्यावर बालकाला  लगेच ओ. आर. एसचे द्रावण द्यावे. एका चमच्यात पिण्याचे पाणी किंवा मातेचे दूध घ्यावे व त्यात एक झिंकची गोळी विरघळून बालकाला दिवसातून एकदा असे 14 दिवस द्यावे. अतिसाराच्या दरम्यान आणि नंतर बालकाला पूरक आहारा आणि स्तनपान देणे चालू ठेवावे.

                                                                                                     जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                                                जालना.

 

No comments:

Post a Comment