Friday 1 July 2022

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती करावी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 


 

जालना दि.1 (जिमाका):- आजच्या आधुनिकतेच्या युगात शेतीक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

    कृषी विभाग जालना, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी व आर. सी. एफ. जिल्हा कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद  साधताना जिल्हाधिकारी बोलत होते.

             कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भिमराव रणदिवे , उप विभागीय कृषी अधिकारी, श्रीमती  शीतल चव्हाण,

            शात्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र – खरपुडी   पंडित वासरे ,वरिष्ठ प्रबंधक -विपणन आर.सी.एफ. विजय बाविस्कर,

सरपंच-वंजार उमरद श्रीमती अनिता रावसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी गोविंद पौल, अर्जुन मत्तलवार,श्री. कमाने,श्रीमती पुष्पा  शिंगणे, प्रगतशील शेतकरी महादेव भास्कर वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

             जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्याची  गरज असल्याचे सांगत बीज प्रक्रियांचे महत्व व बीज प्रक्रिया तंत्रज्ञान आत्मसात करून घेत त्याची जोड आपल्या शेतीला दिली पाहिजे.  शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या अनेकविध योजना असून या कृषी योजनांचाही लाभ घेण्याचे आवाहनही डॉ.राठोड यांनी यावेळी केले.

यावेळी वरिष्ठ प्रबंधक -विपणन विजय बाविस्कर आर.सी.एफ. यांनी बीज प्रक्रियेचे महत्व व बीज प्रक्रिया  कशी करावी याबद्दल माहिती  प्रात्यक्षिकासह दिली.  प्रात्यक्षिकात एफआयबी  म्हणजे प्रथम बुरशीनाशक नंतर कीटकनाशक व शेवटी आर सी एफ चे बायोला (जैविक खत) यापद्धतीने बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन केले.

 शात्रज्ञ  पंडित वासरे यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करत बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त कृषी सहाय्यक अधिकारी नंदकुमार पुंड यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमास शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment